आज रविवार १७ जानेवारी २०२१. कालच करोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आणि या महामारीतून जगाची सुटका होईल अशी आशा धरायला हरकत नाही. असो, हे मनोगत लिहावयास घ्यायचे कारण म्हणजे परवा १९ जानेवारी २०२१ ला माझ्या वडिलांची दहावी पुण्यतिथी आहे. १९ जानेवारी २०११ ला त्यांचे निधन झाले. अजूनही तो दिवस आठवतो, दादा हॉस्पिटलमध्ये झोपला होता आणि सकाळी त्याचा फोन आला, “बाबा गेले नंदू”. पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार होईपर्यंत मी अश्रू रोखले होते, पण दुसऱ्या दिवशी एका कलशामध्ये त्यांच्या अस्थी हातात आल्या आणि मी कोसळलो. दादाला घट्ट मिठी मारली, त्याक्षणी जाणीव झाली वडिलांचे छत्र जोपर्यंत तुमच्यावर असते तोपर्यंत तुम्ही लहान असता आणि सुरक्षित असता. त्यादिवशी ते छत्र कोसळले आणि मागील ३१ वर्षातील आठवणी समोर येऊन उभ्या ठाकल्या.
प्रत्येक मनुष्याला आपले आई वडील कायमच आदर्श वाटतात. अगदी लहानपणापासून आपण कायम थोर व्यक्तींना मोठे करण्यात, त्यांच्या आई वडिलांचा कसा आदर्श होता हे कायम वाचत किंवा ऐकत आलो. माझे वडील कोणी आदर्श व्यक्तिमत्व नव्हते आणि ते बनावे अशी त्यांनी कधी महत्वाकांक्षाही ठेवली नाही. त्यांनी आमच्यावर कुठलेही वेगळे असे संस्कार केले नाहीत कि मी ते ठळकपणे आठवावे आणि लिहावे. मात्र आपल्या बायको-मुलांवर नितांत प्रेम करताना त्यांनी आमच्यावर नकळत असे अनेक संस्कार केले जे आम्हा दोघा भावांना आयुष्यभर पुरतील. त्यातीलच काही ठळक आठवणी लेखणीतून उतरवत आहे.
बाबांच्या लहानपणाबद्दल मला फारसे माहित नाही, पण माझे आजोबा एका खासगी कारखान्यामध्ये कामाला होते आणि आज्जी गृहिणी होती. वडिलांना ४ लहान भावंडे होती (३ बहिणी आणि १ भाऊ). घरातील परिस्थिती बेताची असल्याकारणाने बाबा साधारण १८व्या वर्षी पनवेलहुन पुण्यात आले. पुण्यात नोकरी करता करता, त्यांनी गरवारे कॉलेजमधून बीए पूर्ण केले. बीए पूर्ण झाल्यावर त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरी लागली. पैशाची आवश्यकता असल्याकारणाने दिवसा आकाशवाणीमध्ये नोकरी करायचे आणि संध्याकाळी पुण्यातील एका नामवंत वकिलांकडे त्यांचे सहायक म्हणून कामाला जायचे. माझ्या आजोबांवर नोकरीमध्ये संकट आले, तेव्हा याच वकिलांनी बाबांना विनाशुल्क मदत केली. याच दरम्यान बाबांचा विवाह महाडमधील हर्डीकर कुटुंबातील प्रेमलता हर्डीकर म्हणजेच माझ्या आईशी झाला. पुढे बाबांनी माझ्या एका आत्याला, पनवेलहुन पुण्याला शिक्षणाकरता आणले. १९७२ साली माझ्या दादाचा जन्म झाला. बाबा, आई, माझी आत्या आणि छोटे बाळ असे नारायण पेठेतील पाटणकर वाड्यात अतिशय आनंदाने वास्तव्यास होते. पुढे १९७९ साली माझा जन्म झाला.
पूर्वीच्या काळी घरामध्ये साधारणतः पुरुषाचा दबदबा असायचा, आमच्याकडेही साधारणतः तसेच वातावरण होते. पण तितकीच काळजीहि ते माझ्या आईची करायचे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मला आजही आठवते शेवटच्या क्षणापर्यंत बाबांच्या मुखी माझ्या आईचे नाव होते. आई मला कायम सांगते लग्नानंतरचे जे उमेदीचे दिवस असतात, तेव्हा ज्याप्रकारे शक्य होते माझ्या आई बाबांनी अतिशय आनंदाने संसार केला. त्याकाळातही आहे त्या पैशात वेगवेगळी ठिकाणे फिरणे, बागेत जाणे , नाटक सिनेमाला जाणे, हॉटेल, एलटीए सहली वगैरे छोटे छोटे आनंदाचे क्षण दोघेही मनःपूर्वक जगले. आयुष्य जगण्याकरता प्रत्येकवेळा पैसे आवश्यक असतोच असे नाही. आम्हा दोघा भावांनाही त्यांनी कधी काही कमी पडू दिले नाही. कदाचित चैनीच्या वस्तू मिळाल्या नाहीत , पण गरजेच्या प्रत्येक वस्तू ते आम्हाला आवर्जून आणायचे. आम्हा दोघांच्याही मनात कायम आदरपूर्वक दरारा असायचा त्यांचा. ते फार सोशल नव्हते, पण संसार करताना विमान उड्डाण घेण्यापूर्वी सांगणारी घोषणा मात्र ते नेमाने पाळायचे “दुसरो कि सहायता करने से पहले अपनी सहायता करे”
समाधानी – आमची परिस्थिती तशी बेताचीच होती, अगदी ४ पिढयांचे दारिद्र्य वगैरे नसले तरी फार सधनही नव्हतो. पण मी याचे बाबांना कधी भांडवल करताना बघितले नाही. त्यांना कधी एखाद्या वस्तूच्या हव्यासापोटी झुरताना बघितले नाही. त्यांनी कधीही कुठले कर्ज काढले नाही आणि ते काढायचे नाही असे त्यांचे ठाम मत होते. पुण्यात घर परवड नव्हते म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये दोन खोल्यांचे घर घेतले. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पाहुण्यांना कुठलीही लाज न बाळगता अभिमानाने आमचे छोटेसे घर ते दाखवायचे. कर्ज नको म्हणून त्यांनी कधी दुचाकी घेतली नाही आणि कायम सायकल चालवली. घराला अगदी रंगही तेच द्यायचे. अनावश्यक खर्चाच्या कित्येक छोट्या मोठ्या गोष्टी ते टाळायचे, पण एवढे सगळे असून कधीही मी त्यांना दुःखात बघितले नाही. आता काही जण याला अल्पसंतुष्ट म्हणू शकतील पण मी त्याला समाधानच म्हणेल. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात मी कधी कशाचा अभाव बघितला नाही.
बाबांच्या स्वभावातील अजून एक महत्वाची बाब म्हणजे स्पष्टवक्तेपणा. स्पष्टवक्तेपणा हा माणसाचा गुण कि अवगुण मला माहित नाही, कारण त्याने माणसे दुखावायची शक्यता असते. बाबांच्या या स्वभावामुळे बरेचदा अगदी जवळची माणसेही दुखावली गेली. पण जे दुखावले गेले, त्याचे जर आत्मचिंतन केले तर त्या व्यक्तींनी / त्यांच्या परिजनांनी नकळत का होईना त्यांचे ऐकले आणि आयुष्यात त्याचा दूरगामी फायदाच झाला. आमच्या आईची मात्र तारांबळ उडायची बाबांचे बोल इतरांवर पडू नयेत म्हणून. कुठल्याही प्रसंगाचे अवलोकन करून बाबा त्वरित निर्णय घ्यायचे. प्रसंगी तो निर्णय कठोर असायचा, पण त्यांच्या पठडीत तो योग्य का अयोग्य असे मोजमापन करून तो निर्णय मात्र त्वरित असायचा. आज या वयात त्यांनीं `घेतलेले कित्येक निर्णय आम्हाला तेव्हा पटायचे नाहीत पण मागे वळून बघताना ते योग्य होते हे कायम जाणवत राहते. याचबरोबर ते प्रगशील विचाराचे होते. देवावर श्रद्धा होती पण कर्मठपणा नव्हता. आईवर, मुलांवर त्यांनी कुठलीही बंधन लादली नाहीत.
साधारण ३५ वर्षे बाबांनी अतिशय झोकून आणि समर्पितपणे आकाशवाणी मध्ये नोकरी केली. या काळात त्यांच्यी औरंगाबाद आणि गोव्यामध्ये बदली झाली. माझा जन्म औरंगाबादचाच. आमचे शालेय शिक्षण मध्यावर असल्याकारणाने गोव्याला मात्र ते एकटेच वास्तव्यास होते. गोव्यातील पणजीनजीक रायबंदर नावाच्या ठिकाणी ते राहायचे. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तिथे जायचो. त्यांचे संपूर्ण विश्व हे आकाशवाणी होते. आकाशवाणीमधील त्यांचे सहकारी, वरिष्ठ, विविध मान्यवरांच्या झालेल्या त्यांच्या भेटीगाठी, पुणे मॅरेथॉन कव्हरेज आम्हालाही हे सगळे रोजचे रुटीन झाले होते. आकाशवाणीमध्ये कनिष्ट लिपिक म्हणून रुजू झालेले बाबा प्रोग्रॅम एक्सएक्युटीव्ह म्हणून निवृत्त झाले. एका बदलीनिमित्ताने मिळालेली बढती नाकारल्यामुळे, असिस्टंट स्टेशन डायरेक्टर व्हायचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.
५८व्या त्यावर्षी बाबा निवृत्त झाले, त्यानंतरचे त्यांचे आयुष्य मात्र तसे आजारपणातच गेले. तरुणपणी लागलेल्या सिगरेटच्या व्यसनामुळे, त्यांच्या फुफुस्साची कार्यक्षमता कमी होत गेली. आणि अखेर त्यातच ७१व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आज माझी वयाची ४३शी उलटली आहे. आपले लाड करणाऱ्या बहुतांशी व्यक्ती आता हयात नाहीयेत आणि त्यांची जागा आम्ही घेतली आहे. माझ्या मुलांना माझ्या वडिलांचा फार सहवास मिळाला नाही, याचे मला कायम दुःख वाटते. आमच्या संसारात आम्ही सर्व व्यस्त आहोत, त्यामुळे दररोज आठवणी येणे आता कमी झाले असले तरी बाबांच्या आठवणी मनात कायमच्या घर करून आहेत.
बाबांच्या स्वभावरून एक मात्र नक्की, बाबा जिथे असतील तिथे सुखी असतील. एवढे लिहून हे छोटेखानी लिखाण संपवतो.
गेली १०-१५ वर्षे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातची कमान हातात घेतल्यापासून अमिताभ बच्चनच्या भारदस्त आवाजात एक घोषणा सातत्याने आपल्या कानावर पडते – “कुछ दिन तो गुजारो गुजरातमे”. मित्रहो! आज पुन्हा एकदा वर्षभराने नवीन प्रवास वर्णन लिहीत आहे ते आमच्या गुजरात सहलीनिमित्त. करोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेनंतर आणि जुलैमध्ये लसीकरणांनंतर आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला लागले. दिवाळी दरम्यान सोशल मीडियावर अनेकांच्या सहलीची छायाचित्रे दिसायला लागली. एकाने तर अतिशयोक्ती करून सांगितले गोव्यात हॉटेल्स उपलब्ध नसल्याकारणाने पर्यटक समुद्र किनाऱ्यावर झोपले आहेत. दिवाळी निमित्त आम्ही मित्रपरिवारही एकत्र आलो होतो. सहलीचा विषय निघाला आणि साधारणपणे गुजरातमधील “स्टॅचू ऑफ युनिटी” आणि “रण ऑफ कच्छ” करावे असे मनात आले.
जेव्हा प्रत्यक्ष्य सहलीची रचना करायला लागलो, तेव्हा लक्षात आले या दोन्ही जागांमध्ये साधारण ५०० किओमीटरचे अंतर आहे आणि हातामध्ये फक्त ५ दिवस आहेत. पुन्हा पुन्हा गुजरातमध्ये जाणे शक्य नव्हते, त्यामुळे संपूर्ण रूपरेषा ५ दिवसात कशी करता येईल याचा विचार करायला लागलो. एकमत होत नसल्याने आणि प्रवासही खूप असल्याने ट्रॅव्हल एजेंटची मदत घ्यावी असे ठरले. थोडीफार चर्चा करून, सहलीची अंतिम रूपरेषा ठरली. पुणे-मुंबई-केवडीया-वडोदरा-अहमदाबाद-भुज–कच्छ-अहमदाबाद-पुणे असा २००० किलोमीटरचा प्रवास आणि ४ कुटुंब.
प्रत्यक्ष सहल सुरू होईपर्यंत, करोनाचे सावट पुनःश्च गडद व्हायला लागले आणि सहल होणार कि नाही याची शाश्वती वाटेनाशी झाली. अखेर २८ डिसेंबर ही तारीख उजाडली आणि आता आपण सहलीला जाणार हे नक्की झाले.
दिवस १ – २८ डिसेंबर २०२१ – मुंबई ते केवाडिया (गुजरात) : साधारण संध्याकाळी ५ वाजता आम्ही सर्व चिंचवडहून नियोजित टेम्पो ट्रॅव्हलर मधून निघालो. मुंबईचे ट्रॅफिक किती अनिश्चित आहे याचा प्रत्यय आम्हाला प्रवासाच्या पहिल्याच टप्यात आला. साधारण कळंबोलीजवळ २ तासाच्या ट्रॅफिकजॅममध्ये अडकलो आणि रात्री १०.४५ च्या दरम्यान दादरला पोहोचलो. नजीकच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून, अगदी १5 मिनिट आधी रेल्वेमध्ये बसलो. दादर ते थेट केवडीया हि ट्रेन दररोज रात्री चालते. बऱ्याच वर्षांनी रेल्वे प्रवास करत होतो आणि नमूद करायला आवडेल बोगी स्वच्छ होती. कुठलाही प्रवास करताना आपल्याला विभिन्न संस्कृती आणि विविध समाजाचा अनुभव येतो. संपूर्ण बोगीच गुजराती बांधवांनी भरली असल्याने, आम्हाला हा अनुभव प्रवासाच्या पहिल्याच टप्यात आला. 😊
केवडीया रेल्वे स्टेशन
केवडीया रेल्वे स्टेशन
दिवस २ – २9 डिसेंबर २०२१ – स्टॅचू ऑफ युनिटी (केवडीया ) : सकाळी ७.३० वाजता आम्ही केवडीया रेल्वे स्टेशनला पोहोचलो. स्टॅचू ऑफ युनिटी, नर्मदा जिल्ह्यातील केवडीया या छोट्याश्या तालुकावजा गावात नर्मदा धरणावर बांधला आहे. बरोड्यापासून साधारण ८६ किलोमीटर अंतर असेल या गावाचे. नियोजित योजनेप्रमाणे आम्ही नर्मदा टेन्ट सिटी २ मध्ये राहणार होतो आणि केवडीया स्टेशनला आम्हाला कॉम्पलिमेन्टरी पीक-अप होता. थोडेसे अनऑर्गनाइज्ड वाटले आणि इथे साधारण अर्धा तास गेला आमचा. बसमधून पुढे ६ किलोमीटरवर आमचे रिसॉर्ट होते, जाताना सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य पुतळ्याची झलक मिळाली. रिसॉर्टवर पोहोचल्यावर थोडे फ्रेश झालो आणि न्याहारी करून घेतली. आम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ली चेक-इन मिळाले नाही, दुपारी १२.३० पर्यंत आम्हाला थांबायला लागणार होते. २ ते २.३० तास आम्ही रिसॉर्टच्या बाजूला असेलल्या नर्मदा नदीच्या बॅकवॉटरवर घालवले.
दुपारी २.३० च्या सुमारास जेवण करून आम्ही स्टॅचू ऑफ युनिटीला जायला निघालो. या परिसरात बाहेरील डिझल किंवा टुरिस्ट गाड्यांना परवानगी नसल्याकारणाने, येथील इ रिक्षा किंवा पब्लिक बसेस मधून प्रवास करायला लागतो. आम्ही बसचा पर्याय निवडला, परंतु रिक्षाचा पर्याय थोडा महाग असला तरी तोच निवडावा असे वाटले. आम्हाला ३ तासांमध्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर, डॅम व्हिव पॉईंट, स्टॅचू ऑफ युनिटी आणि लेजर शो करायचे होते. याशिवाय या भागात रिव्हर राफ्टिंग आणि सायकलिंग या २ ऍक्टिव्हिटी आहेत. हे सर्व करायला इथे किमान २ दिवस हवेत आणि आम्हाला हे सर्व ३ ते ४ तासात करायचे होते. आम्ही घाई घाईमध्ये पहिले डॅम व्हिवला गेलो, इथे विशेष काही नव्हते. महाराष्ट्रातील कितीतरी धरणांची सह्याद्री पर्वतरांगांमधून दिसणारी दृश्ये कैक पटीने अधिक नयन रम्य आहेत असे वाटले. येथून पुढे आम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवरला गेलो, हि जागाही सोसो होती. ऐकीव माहितीनुसार हि जागा या भागातील डंप यार्ड होते. सरदार पटेलांच्या पायाशी असलेली जागा सुंदर असावी या कारणांस्तव, मा. नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार या जागेचे बगीच्यामध्ये रूपांतर करण्यात आले.
स्टॅचू ऑफ युनिटी :
व्हॅली ऑफ फ्लॉवरहुन पुढे आम्ही स्टॅचू ऑफ युनिटीला गेलो आणि समोर आला १८२ मीटरचा सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५६२ विविध संस्थानाचे एकत्रीकरण करून भारतीय संघराज्य बनवण्याचे मोलाचे आणि तितकेच कठीण कार्य भारताचे पहिले ग्रहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी केले. स्टॅचू ऑफ युनिटी हा भव्य पुतळा, या लोहपुरूषाच्या विशेष सन्मानार्थ बांधला आहे. एखाद्या दृढनिश्चयी व्यक्तीचा तितक्याच दृढनिश्चयी व्यक्तीकडून संकल्प ठरवून केलेला सन्मान आमच्या नजरेत दिसत होता आणि त्याच बरोबर त्या साधारणश्या परिसराचा केलेला कायापालट दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार इथे दररोज साधारण १५००० पर्यटक भेट देतात, या तुलनेत स्टॅचू ऑफ लिबर्टीला साधारण १०००० पर्यटक भेट देतात. संपूर्ण गावाचे आणि पर्यायाने गुजरात राज्याचे अर्थकारण या एका भव्य प्रतिकृतीने बदलले आहे.
बरोबर आणलेले सामान काउंटरला देऊन आम्ही पुतळ्याच्या अधिक-अधिक जवळ जायला लागलो. हा पुतळा आपण 2 प्रकारे बघू शकतो, पहिला डेक आपल्याला एस्कलेटरने सरदार पटेलांच्या पावलांशी घेऊन जातो. आम्ही सर्वही पहिल्या डेकवर गेलो. पावलाशी गेल्यावर आपण सरदारांच्या पावलाच्या बोटाएवढेही नाही याची कल्पना आपल्याला येते. संपूर्ण वर्तुळाकार डेकवरून आपल्याला चोहूबाजूने नर्मदा नदीचे पात्र दिसते. हि सर्व दृश्य बघून आम्हा सर्वांच्या अंगावर शहरे आली. येथून खाली उतरून लिफ्टने आम्ही ऑब्झर्वेशन डेकच्या रांगेत उभे राहिलो. लिफ्टने आपण साधारण १२२ मीटरवर आतील बाजूने सरदारांच्या छातीपर्यंत येऊन पोहोचतो. येथूनही आपल्यास नर्मदेचे एका बाजूचे पात्र दिसते. अजून एक नमूद करण्यासारखी आणि अभिमानस्पद माहिती म्हणजे, या भव्य पुतळ्याचे प्रमुख वास्तुविशारद ९१ वर्षीय मराठमोळे पद्मभूषण राम सुतार आहेत. भारत सरकारतर्फे त्यांचा इ.स १९९९ मध्ये पद्मश्री आणि इ.स २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. अतिशय तृप्त मनाने लेसर शो बघायला आम्ही खाली उतरलो आणि आमच्या बुकिंग मधील गोंधळ पुन्हा एकदा अनुभवला. हा लेसर-शो बघायला २ डेक आहेत आणि दोन्ही मिळून फक्त १२० लोकांना प्रवेश मिळतो. हे फुल्ल झाल्यावर आपल्याला प्रवेश मिळत नाही आणि या करता वेळेत बुकिंग करणे आवश्यक असते. आमच्या ट्रॅव्हल प्लॅनरकाढून या बाबतीत हलगर्जीपणा झाला होता. आपली फसगत झाली आहे हे लक्षात आले परंतु चीड चीड करण्याशिवाय आमच्या हातात काही नव्हते. रस्त्यावरून थोडीफार लेझरशोची दृश्ये बघितली आणि रिसॉर्टवर परतलो. पुन्हा येथे नियोजनातील त्रुटी लक्षात आल्या आणि आपल्या अपूर्ण माहिती मिळाली आहे याचा प्रत्यय आला. आमचे जे रिसॉर्ट आहे ते एका भागात होते आणि ६ वाजता तेथील परतीच्या बस बंद होतात. येथील इ-रिक्षा फक्त स्त्रिया चालवतात आणि हॉटेल दुर्गम असल्याने विशेष कोणी येण्यास उत्सुक नव्हते. अखेर एक “दीदी” ४ फेऱ्या मारायला तयार झाली आणि आम्ही परत फिरलो. एव्हाना थंडी वाढली होती आणि आजूबाजूच्या परिसरात केलेली रोषणाई छानशी दिसत होती. परत आल्यावर पुढच्या प्रवासाकरता असलेल्या आमच्या नियोजित टेम्पो ट्रॅव्हलरचा पास मिळवला जेणेकरून पुढील प्रवास सुकर होईल. जेवण करून थोडावेळ सांस्कृतिक कार्यक्रम बघून आम्ही झोपायला गेलो. डोळे मिटल्यावर मनात विचार आला, थोडेफार गैरव्यवस्थापन झाले परंतु मानवनिर्मित भव्य निर्मिती बघून डोळ्याचे खऱ्या अर्थाने पारणे फिटले. मनात अलगद हा विचार आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अरबी समुद्राच्या मधोमध बनेल तेव्हा तो मराठी माणसाकरिता खरोखर एक अभिमानाचा क्षण असेल.
येथे सहलीच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे -
१) किमान २ दिवसांचे नियोजन करावे २) साधारण दुपारी १२ पर्यंत इथे पोहोचावे.
३) ४-५ जागा इथे बघायला आहेत,पण स्टेटचू ऑफ युनिटी आणि त्याचा लेझर शो हे सगळ्यात आकर्षक आहे. येथील रोषणाई बघायला रात्रीचा वेळ ठेवावा. ४) बाकी गोष्टीतील सायकलिंग आणि राफ्टिंग करता येईल. हे करताना निवांत वेळ घालवता येईल हे बघावे ५) महाग असली तरी शक्यतो टेन्ट सिटी १ मध्ये राहावे अथवा दुसरे सोयीस्कर ठिकाण निवडावे. ६)दिवसभराकरिता इ-रिक्षा किंवा इ-कार बुक करावी. ७) केवडीयापासून २०० किलोमीटरमध्ये बरोडा आणि अहमदाबाद शहरे आहेत. केवडीया-बरोडा-अहमदाबाद केवळ अशी ५ ते ६ दिवसाची सहल करावी. ८) पुणे-मुंबईच्या प्रवाश्यांना स्वतःचे वाहन घेणे अधिक योग्य, किंवा सरळ अहमदाबादपर्यंत विमान प्रवास करावा.अहमदाबाद ते केवडीया जनशताब्दी ट्रेनला नजीकच्या काळात विस्ताडोम कोच बसवले आहेत ज्याच्यातून तुम्हाला ३६० डिग्री व्हिव मिळतो.
दिवस ३ – ३०.१२.२०२२ – केवडीया ते अहमदाबाद व्हाया बरोडा – सकाळी ८.३० वाजता न्याहारी करून बरोड्याला निघायचे आमचे नक्की झाले होते. बरोड्यामध्ये लक्ष्मीविलास पॅलेसला भेट द्यायची आणि अहमदाबादला निघायचे असा प्लॅन होता. केवडीया ते बरोडा अंतर ९० किलोमीटर आहे आणि साधारण २ तासाचा प्रवास आहे. ठरल्याप्रमाणे न्याहारी करून निघालो आणि समोर लॅव्हिश टेम्पो ट्रॅव्हलर दिसली. १७ सिटरला १२ सीटरमध्ये रूपांतर केले होते आणि आतमध्ये पुशबॅक बकेट सीट्स होती. आतले इंटेरिअरही अतिशय सुंदर होते. एकंदरीतच आम्ही खुश झालो आणि सकाळी ९.३० ते १० वाजता आमचा प्रवास सुरु केला.
लक्ष्मीविलास पॅलेस, बरोडा – दुपारी १२ वाजता आम्ही बरोड्याला पोहोचलो. तिकीट काऊंटरला सगळ्यांची तिकिटे काढून आम्ही महालामध्ये गेलो. रिसेप्शनवर आम्हा प्रत्येकाला ऑडिओ प्लेअर दिला गेला. हा प्लेअर मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. साहजिकच आम्ही मराठी भाशा निवडली. हा ऑडिओ प्लेअर म्हणजे या जागेची माहिती देण्याकरता चक्क रेकॉर्डेड मार्गदर्शक आहे. पॅलेसच्या रचनेनुसार आणि त्यातील विविध भागांनुसार माहिती ध्वनिमुद्रित केली आहे. आपण प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर, तिथे असलेल्या संग्रहित वस्तूंची इत्यंभूत माहिती आपल्याला यावर मिळते आणि हा महाल पाहणे सुकर होते. या महालाची थोडक्यात माहिती अशी कि, हा महाल मराठा सरदार महाराजा सयाजीराव गायकवाडांनी १८९० मध्ये बांधला. ५०० एकरवर पसरलेली हि जगातील सगळ्यात मोठी निवासी वास्तू आहे. अगदी तुलना करायची झाली तर हा महाल बंकींगहॅम पॅलेसच्या चौपट आहे. या महालातील विशिष्ठ रंगरचना, झुंबर आणि विविध कलाकृती बघून येथील ऐश्वर्याचे दर्शन घडते. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी या महालातील विविध कलाकृती साकारायला त्याकाळातील प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्माला पाचारण केले होते. महालातील एका खोलीमध्ये प्राचीन काळातील मुख्यतः मराठा साम्राज्यात वापरलेल्या शस्त्रात्रांचे प्रदर्शन आहे. विविध शस्त्रांची माहिती ऐकायला खरेच छान वाटते. महालाच्या आजूबाजूला मोठे उद्यान आणि गोल्फ कोर्स आहे. महालात न्याहारीचीही सोय आहे. थोडी फार न्याहारी करून आम्ही महालाच्या परिसरात असलेले महाराजा फतेहसिंघ संग्रहालय बघायला गेलो. इथे प्रमुखतः विविध चित्रकृती आणि जुन्या काळातील पेहरावांचे प्रदर्शन आहे. एव्हाना दुपारचे दीड वाजले, थोडी चौकशी करून आम्ही ‘गोवर्धन थाल’ या गुजराती डायनिंग हॉलमध्ये जेवायला गेलो. एकंदरीत छान जेवण होते, परंतु इतके पदार्थ एकदम जात नाहीत. संध्याकाळी अहमदाबादच्या अक्षरधाम मंदिरात जाण्याचा आमचा ओरिजिनल प्लॅन होता, परंतु उशिर झाल्यामुळे ते होणे शक्य नव्हते. म्हणून बरोड्याच्या सयाजी बागेत आम्ही थोडा वेळ घालवला. येथून पुढे आम्ही सरळ अहमदाबाद्ला निघालॊ. बरोडा ते अहमदाबाद हे साधारण ११५ किलोमीटरचे अंतर आहे. संध्याकाळी ७ वाजता आम्ही अहमदाबादला पोहोचलो. अहमदाबाद्ला आमचा फक्त नाईट हॉल्ट होता. सर्व बायकांचा खरेदीचा प्लॅन होता, पण तेथे संप असल्याकारणाने विशेष काही मिळाले नाही. आजचा बहुतांश दिवस प्रवासात गेला. नजीकच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही सर्व झोपी गेलो.
दिवस ४ – ३१.१२.२०२१ – अहमदाबाद – भुज : आज आम्हाला भुजला निघायचे होते. अहमदाबादमध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत, परंतु आमच्या हातात फक्त आजचा अर्धा दिवस होता. म्हणून आम्ही ३ जागा बघायच्या ठरवल्या. अदलज स्टेपवेल, अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर आणि अहमदाबादपासून ९० किलोमीटरवर असलेले मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर. एक दिवसाच्या नाईटओव्हरमध्ये सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे सामान उतरवा आणि परत भरा. सकाळी १० वाजता आम्ही निघालो आणि १५ किलोमीटरवर असलेल्या अदलज स्टेपवेलला पोहोचलो.
अदलज स्टेपवेल, अहमदाबाद – स्टेपवेलला अचूक मराठी शब्द मिळाला नाही परंतु जर रचनेचा विचार केला तर विशिष्ट रचना असलेली विहीर आणि पायऱ्या. उत्तर भारतात अश्या तर्हेच्या अनेक विहिरी आहेत, एकट्या गुजरातमध्ये अश्या १२० विहिरी आहेत. अदलज विहीर यातील सर्वात मोठी आहे. हि विहीर वाघेला साम्राज्याचे राजा राणा वीरसिंगनी १४९८ मध्ये पावसावरील अवलंबित्व कमी करण्याकरता बांधायला घेतली. परंतु बांधकाम पूर्ण होण्याआधीच मोहम्मद बेगडा या मुस्लिम शासकाने आक्रमण केले आणि त्यात राणा वीरसिंगना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने या विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडला. याचे बांधकाम पुढे मोहम्मद बेगडाने केल्यामुळे या विहिरीच्या बांधकामावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संस्कृतीचा प्रभाव दिसतो. साधारण इथे एखाद तास घालवून आम्ही पुढे अक्षरधाम मंदिराकडे जायला निघालो.
स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर – दुपारी १२ वाजता आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. २००२ साली झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. मोबाईल-कॅमेरा आत नेण्यास परवानगी नाहीये. सर्व वस्तू जमा करून आम्ही आत गेलो. स्वामी पंथाच्या योगीजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन प्रमुख स्वामी महाराजांनी १९७९ साली स्वामीनारायण मंदिराचा पाया रचला आणि १३ वर्षांमध्ये १९92 साली हे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण मंदिर परिसर, २३ एकराचा आहे. अतिशय भव्य आणि तितकेच आकर्षक असे हे मंदीर आहे. मंदिरातील भगवान स्वामी नारायण, त्यांचे शिष्य आणि सर्व देवी देवतांच्या मुर्त्या खूपच सुबक आणि प्रसन्न अश्या आहेत. संपूर्ण जगभरात एक हजारहून अधिक स्वामीनारायण मंदिरे आहेत. काही वेळ मंदीर परिसरात घालवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मंदीर परिसरात फोटो काढायला परवानगी नसल्या कारणाने, इंटरनेटवर उपलब्ध असलेले फोटो या ब्लॉग करता वापरत आहे.
सूर्य मंदिर, मोढेरा – येथून पुढे, आम्ही मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिराकडे मोर्चा वळवला. आमच्या नियोजित योजनेनुसार हे ठिकाण करायचे नव्हते. परंतु प्रवासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भूजला जाताना थोडी वेगळी वाट करून या जागेला जाणे शक्य होते. संपूर्ण प्रवास साधारण दोन – अडीच तासाने वाढणार होता. आधीच उशीर झाल्यामुळे पटकन सबवेमध्ये सेंडविचेस खाल्ले आणि तीन वाजेपर्यंत मोढेराला पोहोचलो. मोढेराचे सूर्य मंदिर, १० व्या शतकात चालुक्य राजवंशातील राजा भीमाने बांधले. हे मंदिर मेहसाणा जिल्ह्यातील पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर बांधले आहे. या मंदिरात सध्या कुठलीही पूजा अर्चना होत नाही आणि मंदिर पुरातत्व खात्याच्या अख्त्यायारीत येते. या मंदिर परिसराचे मुख्यतः ३ भाग आहेत, मुख्य मंदिर, सभा मंडप आणि पाण्याचे कुंड. गेली काही वर्षे तामिळनाडू किंवा कर्नाटकातील विविध प्राचीन मंदिरे बघितली, हे मंदिरही त्याच शृखंलेतले आहे. साधारण १ तास आम्ही येथे काढला.
सूर्य मंदिर, मोढेरा
मोढेरा ते भुज – मोढेराहून पुढे आम्ही भूजला निघालो. साधारण ३१६ किलोमीटरच्या प्रवासाला ६ तास लागणार होते. काही रस्ता सुस्थितीत तर काहीसा खराब असा होता. मोढेराहून निघाल्यावर मोहरीची पिवळी शेती रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच्या-लांब पसरेलली दिसत होती. गाडीमध्ये गाणी, भेंड्या, आणि वेगवेगळे खेळ करत वेळ कसा गेला कळलेच नाही. माझ्या मते कुठल्याही प्रवासाची हीच मजा असते. पोहोचेपर्यंत रात्रीचे १०-१०.३० वाजले. आज वर्षाचा शेवटचा दिवस होता. जेवण करून आणि थोडे ताजेतवाने होऊन आम्ही सगळे मस्तपैकी पत्याचा डाव मांडला आणि नवीन वर्षाचे स्वागत करून सर्वजण झोपी गेलो.
दिवस ५ – रण ऑफ कच्छ : ०१.जानेवारी २०२२ – आज आमच्या सहलीचे शेवटचे आणि प्रमुख ठिकाण होते. ग्रेट रण ऑफ कच्छ. आमचे हॉटेल भुज रेल्वे स्टेशनला लागूनच होते आणि आणि तेथेच “रण उत्सव – टेन्ट सिटी” चा कॉम्प्लिमेंटरी पीक अप पॉईंट होता. न्याहारी करून साधारण सकाळी ९.30 च्या सुमारास आम्ही बसमध्ये चढलो. रण ऑफ कच्छला आपल्याला एकाच सहलीमध्ये दोन भव्य अनुभव मिळतात – एक प्रत्यक्ष रण आणि दुसरा टेन्ट सिटीने आयोजित केलेला उत्सव. भुज ते कच्छ हे ९० किलोमीटरचे अंतर २ तासात पूर्ण झाले. सरळ रस्ता आणि दोन्ही बाजूला रखरखते वाळवंट असा हा प्रवास होता. सकाळी ११.१५ वाजता आम्ही प्रत्यक्ष “रण उत्सव – टेन्ट सिटीला” पोहोचलो.
२००५ साली छोट्या स्वरूपात सुरु झालेला ३ दिवसाचा रणोत्सव, आता गुजरात टूरिजम भव्य स्वरूपात १०० दिवस चालवते. अनेक इव्हेंट म्यानेजमेन्ट कंपनी आणि लोकल रिसॉर्ट छोट्या मोठ्या स्वरूपात हा महोत्सव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करतात. सगळेच अबव्ह बजेट असले, तरी तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत तश्या सुविधा उपलब्ध आहेत. टेन्टसिटीमध्ये आम्ही साधारण २ तास आधी पोहोचलो होतो, परंतु नर्मदा टेन्ट सिटीपेक्षा कितीतरी अधिक सुखद अनुभव येथे आला. चेक-इन प्रक्रियाहि आरामदायक होती. वेटिंग लॉन्जमध्ये व्यवस्थित बसण्याच्या सोय, चहा-कॉफी-सरबत, सर्व ऍक्टिव्हिटी आणि सुविधांची माहिती स्वागत कक्षातच मिळाली. लागूनच खरेदी करण्याकरता विविध स्टॉल आहेत, तिथे सर्व बायकांनी तासभर यथेच्छ खरेदी केली. २ तास कसे गेले ते कळलेच नाही. साधारण १ वाजता आपापल्या टेन्टमध्ये आम्ही चेकइन केले. ९ समूह आणि ३५० टेन्टसमध्ये विभागलेल्या या टेन्ट सिटीला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. प्रत्येक समूहाच्या बाहेर प्रशस्त मैदान आहे. एकदम आटोपशीर तरीही सर्व सुविधांयुक्त असे हे टेन्ट आहेत. आमच्या मुला-मुलींना खेळायला कुत्री आणि सायकली मिळाल्या त्यामुळे त्यांनी धमाल केली. येथील सर्व रेस्टॉरंटची मांडणी वेगवेगळ्या समुहानुसार केली आहे, जेणेकरून व्यवस्थापन योग्यतर्हेने केले जाईल. रेस्टॉरंटची सजावट आणि जेवणाचा दर्जा पंचतारांकित हॉटेलचा आहे. दुपारी ३ वाजता आम्ही जेवणे उरकली. आमचा पुढचा प्रोग्रॅम होता, बसने रणला जायचे. आम्ही तडक बसमध्ये जाऊन बसलो.
टेन्टसिटीबद्दल महत्वाची माहिती - नर्मदा टेन्टसिटी २ हि प्रावेग कम्युनिकेशन नावाची बीएसइ लीस्टेड कंपनी चालवते आणि नर्मदा टेन्ट सिटी १ हि लाल्लोजी अँड सन्स चालवते. आमचा पहिला अनुभव प्रावेग बरोबर होता आणि तो सोसो होता. कच्छमध्येही या दोन्ही कंपन्या आहेत. कच्छमध्ये आम्ही लाल्लोजी अँड सन्सच्या "रण उत्सव - द टेन्ट सिटी" मध्ये राहिलो आणि निश्चितच येथील अनुभव अधिक दर्जेदार होता.
रण ऑफ कच्छ, प्रत्यक्ष टेन्ट सिटी पासून २.५ किलोमीटरवर आहे. ग्रेट रण ऑफ कच्छ साधारण ७५०० चौरस किलोमीटर पसरले आहे आणि काही भाग पाकिस्तानातील सिंध प्रांतात आहे. हे पृथ्वीवरचे सर्वात विस्तृत असे मिठाचे वाळवंट आहे. येथून मैलोन्मैल आपल्याला फक्त पांढरी जमीन दिसते. एकेकाळी हा सर्व भाग अरबी समुद्राखाली होता, कालांतराने भूगर्भीय बदलाने समुद्र वेगळा झाला आणि उरले ते मिठाचे वाळवंट. पावसाळ्यात येथे मिठाची दलदल तयार होते आणि आरबीसमुद्राच्या खांबाती-आखाता पसरते. साधारण नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी जिरायला सुरुवात होते आणि त्यानंतर येथे पर्यटक यायला सुरुवात होते. निसर्गाचे हे आश्चर्य आपल्याला थक्क केल्याशिवाय राहत नाही. आमच्यातील कित्येकांना हि माहिती नव्हती आणि त्यांचा समज होता कि हे पांढऱ्या रेतीचे वाळवंट आहे. साधारण १० मिनिटामध्ये बसने एका थांब्यापाशी पोहोचलो आणि आम्हाला पांढरे रण दिसायला लागले. उंटाच्या गाडीने काही मैल प्रत्यक्ष जागेवर पोहोचलो आणि पूर्ण पांढरे रण दृष्टीक्षेपात आले. मला अथांग पसरलेल्या समुद्राचे किंवा अथांग नदीपात्राचे मला खूप कुतुहूल वाटते. इथेही काहीसे असेच दृश्य होते. इथे तासनतास शांत बसून राहावे असे वाटत होते, परंतु कमीवेळात पूर्ण सहल करायची असल्याने हे शक्य होत नाही. उंटगाडीतून उतरल्यावर आमच्यापैकी सर्व मुलींनी (लहान आणि मोठ्या दोन्ही) पॅरामोटोरिन्ग केले. मुलांनी उंटाची फेरी मारली. काही वेळ येथे बसून आणि फिरून आम्ही घालवला. साधारण संध्याकाळी ७ वाजता परत जायला निघालो. काही जण बसने परत गेले तर काही जण उंटगाडीने. थोडेसे फ्रेश होऊन, रात्रीचे जेवण करून घेतले. त्यांनतर इथे कल्चरल प्रोग्रॅम होता, तो साधारण तासभर बघितला. येथील स्थानिक कलाकारांची गाणी, फोल्क डान्स आणि काही विशेष थक्क करणारे स्थानिक कार्यक्रम. छान वेळ गेला या कार्यक्रमात. येथे यायचे साधारण २ दिवस आहेत पौर्णिमा किंवा अमावास्या. या दोन्ही दिवशी ताऱ्यांनी भरलेले पूर्ण आकाश अतिशय विलोभनीय दिसते. आम्हाला हा अनुभव लडाखमधील नुब्रा व्हॅलीला आलेला. आज ढग असल्याने मात्र तारे स्पष्ट दिसत नव्हते. हा कार्यक्रम बघून, थोडे फार फिरून आम्ही पुन्हा टेन्टपाशी आलो. थोड्या फार गप्पा मारून झोपी गेलो.
टेन्ट सिटी, कच्छ
दिवस ६ परतीचा प्रवास – कच्छ – अहमदाबाद – पुणे: ०२.जानेवारी २०२२ : पहाटे लवकर उठून आम्ही २.५ किलोमीटर व्हाईट-रणपर्यंत मॉर्निंग वॉल्क केले आणि न्याहारी उरकून सकाळी ९.३० ला परतीचा प्रवास सुरु केला. आम्हाला कच्छला आल्यावर असे जाणवले अजून किमान २-3 दिवस तरी इथे हवे होते, काही महत्वाच्या जागांना आम्हाला जाता आले नाही. असो, आम्हा सर्वांनाच हा विचार मनात आला कि ज्या स्केलने हि इव्हेंट रिसॉर्टने आयोजित केली आहे ते खरेच अविश्वनीय आहे. आमची बस साधारण ११.३० पर्यंत भूजला आली आणि पुढील ६ तासांचा अहमदाबादपर्यंतचा प्रवास आमच्या ट्रॅव्हलरने मौजमस्ती करत केला. वाटेमध्ये चामुंडाकृपा नावाच्या एका ढाब्यावर गुजराती जेवण केले. अतिशय माफक दरात छान जेवण मिळाले. एअरपोर्टवर फार वेळ नव्हता, रात्री ९.३० वाजता आमच्या विमानाने उड्डाण केले आणि साधारण रात्री १२ वाजता चिंचवडला आम्ही सर्व घरी पोहोचलो. नेहमीपेक्षा या सहलीमध्ये थोडेफार ढिसाळ नियोजनाचा अनुभव आला, परंतु असे आंबट-गोड अनुभवसुद्धा तुम्हाला अनन्य आठवणींचे अल्बम तयार करून देतात आणि पुढच्या सहलीचे नियोजन अधिक सचोटीने करायची ऊर्जा देतात. पुन्हा भेटूया लवकरच, धन्यवाद!!
कच्छ / भुजजवळील इतर महत्वाची ठिकाणे - 1) कोटेश्वर महादेव हे प्राचीन महादेवाचे मंदिर(येथे भारताची जमीन संपते - धनुषकोडीसारखी), 2) कलोडुंगर जेथून रण ऑफ कच्छचा ३६० डिग्री पॅनारॉमिक व्हिव दिसतो 3) मांडवी समुद्र किनारा 4) भुजमधील स्वामीनारायण मंदिर
5) ढोलावीरा आणि सुरकोटाडा हि हडप्पा संस्कृतीची प्रतीके.
नमस्कार! पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमधील शेवटच्या आठवड्यात आमच्या दुर्गसफरीमध्ये खंड पडला . आम्ही तीन मित्र सापुतारा आणि इगतपुरीच्या सहलीला सहपरिवार गेलो. सापुतारा हे महाराष्ट्राच्या सीमेवरचे गुजरातमधील हिल स्टेशन. ४ दिवसाच्या सहलीत आम्ही सापुतारा आणि डांग जिल्ह्यातील आजूबाजूच्या काही जागा बघितल्या. जागा ठीक ठीक स्वरूपाच्या होत्या, पण रिसॉर्ट मात्र छान होते. हा भाग पावसाळयात अधिक मोहक असेल, परंतु पुण्यातील पर्यटकांना पावसाळी जागांचे फार कौतुक नसावे. एकंदरीत परिवारासोबत छान वेळ गेला. सापुतार्याहुन पुढे आम्ही सप्तशृंगीगडावर गेलो आणि वणीच्या देवीचे दर्शन घेतले. या गडावर रोपवेने जाता येते, एकूणच छान सोय केली आहे आणि स्वछताही आहे. पुढे आम्ही नाशिकजवळील इगतपुरीमध्ये एक रात्र घालवली आणि छोटीशी पार्टी केली. इगतपुरीतील विपश्यना केंद्राला भेट देऊन परतीचा प्रवास सुरु केला.
सापुतारा – डिसेंबर – २०२०
इगतपुरी विपश्यना केंद्र – डिसेंबर २०२०
दुर्ग ५ – किल्ले सरसगड / ०९.०१.२०२१ – आमचा पुढील गड होता, रायगड जिल्ह्यातील किल्ले सरसगड. पाठदुखीमुळे आमच्यातील एक मित्र येऊ शकला नाही. आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्यामुळे, आमच्याही प्रवासाची शाश्वती नव्हती. परंतु प्रवासाच्या दिवशी सकाळी पाऊस थांबल्यामुळे, आमचे जायचे निश्चित झाले. सरसगड हा अष्टविनायकातील प्रसिद्ध अश्या पाली गावाच्या सीमेलगत येतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने खोपोलीहून आम्ही पालीच्या दिशेने गेलो. सकाळचा प्रहर असल्यामुळे मंदिरापाशी पार्किंगची सहज सोय झाली. बाजूलाच असलेल्या एका टपरीमध्ये चहा पिऊन चढायला सुरुवात केली. गावातील घरांमधूनच गडाचा पायथा लागतो. आमच्याबरोबर काही स्थानिकही शनिवारचे रुटीन म्हणून गड चढत होते. कोकण आणि त्यात ढगाळ वातावरणामुळे हवा अधिकच दमट होती. चढणही बऱयापैकी असल्यामुळे दम लागत होता आणि घामाच्याही धारा लागल्या. साधारण अर्धा-पाऊण तास गड चढल्यानंतर, अतिशय सुबक अश्या दगडात कोरलेल्या १००-१५० उंच पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर, नजीकच्या काळातच नूतनीकरण केलेले मुख्य प्रवेशद्वार लागले. इथून संपूर्ण वळसा घालून गडाचे विरुद्ध दिशेतील प्रवेश द्वार लागते. वळसा घालताना वाटेत पाण्याची भरपूर टाके, गुहा आणि गोदामे लागतात. या प्रवेश द्वारापासून गडाची पुढील चढाई सुरु होते. पुढील साधारण १५-२० मिनिटामध्ये गड चढून पूर्ण होतो आणि बालेकिल्ला लागतो. इथे पाण्याचे एक मोठे तळे आणि केदारेश्वर मंदिर आहे. गडावरून खाली संपूर्ण पाली गाव दिसते आणि अंबा नदीही दिसते. या गडावरून सुधागड आणि घनगडही दिसतात, परंतु दमट वातावरणामुळे आम्हाला दिसले नाहीत. येथे लिहिलेल्या ऐतिहासिक दाखल्यानुसार या गडाचा मुख्यतः टेहळणी बुरुज म्हणून वापर होता. आत्तापर्यंत केलेल्या सर्व ५ गडांमध्ये हा गड राहण्यासाठी उत्तम होता आणि गड म्हणूनही आकर्षक होता. काही वेळ एका झाडाखाली बसून घरातून आणलेले दडपे पोहे आणि गुळाच्या पोळ्या खाल्ल्या आणि परतीचा प्रवास सुरु केला. एव्हाना ऊन डोक्यावर आलेले आणि या वेळेला उतरतानाही तेवढीच दमणूक झाली. एक मित्र थोडासा मागे राहिला आणि त्याच्याजवळ पाणी नसल्यामुळे त्याला अधिकच त्रास झाला. खाली उतरून लिंबू सरबत पिऊन शरीराला थोडे थंड केले. परत येताना लोणावळ्यामधे मम्मीज किचनमध्ये जेवलो. अतिशय सामान्य दर्जाचे हॉटेल आहे, पण गर्दी मात्र खूप होती.
दुर्ग ६ – ढाकोबा / १६.०१.२०२१ – या वेळेस पुन्हा जुन्नर तालुक्यातील ढाकोबा हा गड करायचे ठरले. जुन्नरमार्गे सकाळी ७ वाजता आंबोली या पायथ्याच्या गावाशी पोहचलो. उजाडले असल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग आणि सधनता स्पष्ट दिसत होती. पायथ्याशी गाडी लावून चढायला सुरुवात केली. दऱ्याघाट म्हणून फलकही दिसला. डोंगर दर्यातून येणारा पाण्याचा मार्ग आणि दगड-माती वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने बांधावर जाळ्या बांधल्या आहेत. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच खुलत असेल यात काही वाद नाही. थोडे अजून पुढे गेल्यावर डोंगरदऱ्यातून होणाऱ्या सूर्योदयाने लक्ष वेधून घेतले आणि आम्ही पुढची चढाई सुरु केली. पुढे गेल्यावर मार्ग काही सापडत नव्हता, काट्याकुट्यातून चढून पुढे आम्ही एका घळीशी येऊन पोहोचलो. तेथून खाली दिसणारा निसर्ग हा अप्रतिम असा होता. आता आम्हाला पुढे दोन डोंगर दिसत होते आणि या दोन्हीतील नक्की ढाकोबा कुठला हे कळत नव्हते. एक पायवाट दिसली आणि त्याबाजूने चढायला सुरुवात केली. काही प्रमाणात अवघड असे उंच खडक चढून पुढे गेलो आणि मध्यावर येऊन पोहोचलो. डोंगराचा शेवट दिसत होता पण मार्ग काही दिसेना. एका बाजूने चढायला सुरुवात केली पण खूपच काटेरी झुडपे होती आणि तेथून चढता येईना. एका ठिकाणी शांत बसून थोडी न्याहारी केली आणि पुढे डोंगराच्या दुसऱ्या बाजूला निमुळत्या वाटेने चालायला लागलो. एका विशिष्ठ ठिकाणाहून पुन्हा डोंगर चढायला सुरुवात केली आणि जाणवले अतिशय निमुळती, उंच आणि घसरडी वाट आहे. २ मित्र पुढे वाट बघायला गेले. आम्ही काही खडकांवर चढून अर्धवट थांबलो. आमच्या बरोबर मंदारचा लहान मुलगाही होता. काही वेळात आम्ही तिघे परत फिरलो. दोन मित्रांनी मात्र संपूर्ण वर जाऊन आजूबाजूच्या जुन्नरमधील जीवधन आणि अहुपे घाटाचा नजारा बघितला. थोड्यावेळाने तेही परतले. आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि जाणवले आता उतरायची वाटही सापडत नाहीये आणि मोठेच्या मोठे कडे उतरायला लागणार आहेत. थोडा अजून शोध घेतल्यावर अखेर एक पाण्याची वाट सापडली आणि आम्ही तेथून खाली उतरलो. पायथ्याशी आल्यावर जाणवले कि आपले या वेळेला काही तरी चुकले तसेच इथे गडाच्या कुठल्याही खुणा सापडल्या नाहीत. थोडी अधिक माहिती घेतल्यावर कळाले ढाकोबा हा मुख्यतः कोकणातील घाटवाटांवर लक्ष ठेवायचा डोंगर आहे. थोडे फ्रेश होऊन पुण्याकडे परत निघालो आणि या वेळेला पुन्हा वाटेत भुजबळ बंधूंच्या हॉटेलमध्ये जेवण केले.
दुर्ग ७ – रोहिडा – २४.०१.२०२१ – या वेळेस रविवारी सातारा जिल्ह्यातील रोहिडा गडावर जायचे ठरले. दुर्दैवाने २० जानेवारीला मला ताप आला, गुरुवारी माझ्या पत्नीला आणि मुलीलाही आला. मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. शुक्रवारी ताप पूर्ण उतरला होता, पण रविवारी मित्रांबरोबर जायचे असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. शुक्रवारी सकाळी करोनाची चाचणी केली आणि शनिवारी रिझल्ट पॉसिटीव्ह आला आणि म्हणता म्हणता घरातील सर्वच जण पॉसिटीव्ह आले. आमच्या ग्रुप मधील अजून एकास अगदी त्याच वेळेस करोना झाला. बाकीच्या मित्रांनी मात्र ठरल्याप्रमाणे रोहिडा पूर्ण केला. करोनामुळे पुन्हा एकदा साधारण महिन्याचा खंड पडला.
दुर्ग ८ – किल्ले निमगिरी आणि हनुमानगड – १४.०२.२०२१ – साधारण महिन्याभरानंतर आणि करोनानंतरच्या विश्रांतीनंतर, आम्ही पुन्हा त्याच जोशाने दुर्गसफर पुढे सुरु करायची ठरवली. जाऊ नको अशी थोडी धाकधूक होती, कारण डॉक्टरांनी शाररिक श्रम कमी करण्यास सांगितले होते. पण शेवटी मनाचा निश्चय करून जायचे ठरवले. या वेळेला पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातील हडसर जवळील किल्ले निमगिरी करायचे ठरवले. नेहमीप्रमाणे सकाळी पायथ्याशी पोहोचलो आणि चढायला सुरुवात केली. साधारण तास-दिड तासात वर चढलो आणि निमगिरी आणि हनुमानगड हे जुळे गड पूर्ण केले. गडावर काही पडके बुरुज आणि अवशेष दिसतात. येथूनही आजूबाजूचा सुंदर निसर्ग दिसतो. काही दुर्गप्रेमींनी येथील जुन्या पायऱ्या पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अजून पूर्ण झाल्या नाहीयेत. गडाच्या पायथ्याशी अजून काही ऐतिहासिक वास्तू अवशेष आणि स्मारके दिसतात. १२ वाजेपर्यंत खाली उतरलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
या वेळेला खाली उतरल्यावर जाणवले आता ऊन बर्यापैकी लागले आहे, त्यामुळे आता या दुर्गप्रवासात थोडा मोठा खंड घेण्याची गरज आहे. हा विचार मनात आणून या मोसमातील दुर्गसफर आम्ही इथेच संपवायचे निश्चित केले आणि पुन्हा एकदा नव्याने दिवाळीनंतर दुर्गसफर करायचे ठरवले. परंतु या सफरीचा शेवट एखाद्या मस्त सहलीने करावा वाटले आणि तेथेच आमचे सिंधुदुर्गला जायचे नक्की झाले.
स्वर्गीय सिंधदुर्ग – ०४ मार्च ते ०७ मार्च २०२१ – गेल्या ३ महिन्यात ८ गड केल्यानंतर, कुठेतरी आता आम्हाला सहलीचा ब्रेक हवा होता. एखाद्या शांत जागी ३-४ दिवस जावे असे वाटत होते. यु-ट्यूबवर सिंधूदुर्ग पर्यटनाचे काही ट्रॅव्हल विडिओ पहिले आणि येथे जावे हे नक्की केले. थोडा फार ऑनलाईन रिसर्च करून शेवटी लॅण्डमास्टर हॉलीडेच्या मदतीने कुडाळ तालुक्यातील खवणे बीचजवळ “खवणे पॅरॅडाईस” हा होमस्टे नक्की केला. शुक्रवारी सकाळी लवकर उठून खवणेला डायरेक्ट जायचे का आदल्यादिवशी कोल्हापुरात राहून सकाळी उठून जायचे यावर बराच काथ्याकूट झाला. अखेर पुणे-कोल्हापूर-खवणे-पुणे अशी साडेतीन दिवसाची रूपरेषा नक्की झाली. ८ जण नक्की झालेले, जाईपर्यंत शेवटी मेम्बर अदलाबदल होत सात जण राहिले. दोन डीझेल गाड्या घ्यायचे ठरले, मारुती एर्टिगा आणि महिंद्रा क्सयूव्ही ३००.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी ४.३० ला सर्वजणांना पिक करत चिंचवड व्हाया बावधन असे कोल्हापूरच्या दिशेने निघालो. शिरवळमध्ये वडापाव आणि चहाचा ब्रेक घेऊन रात्री ८.३० वाजता कोल्हापूरला पोहोचलो. हॉटेल मराठा रिजन्सीमध्ये आम्ही २ रूम्स बुक केल्या होत्या. कोल्हापुरात राहायचे असल्यामुळे बहुतांशी मित्रांना कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्या रश्यावर ताव मारायचा होता. काहीजणांना असलेली माहिती आणि वाचनात आलेल्या आलेल्या माहितीनुसार हॉटेल ओपेलमध्ये रात्रीचे जेवण करायचे ठरले. पण जेवढे ऐकले, तेवढा काही विशेष मेनू वाटला नाही. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे वेळेत झोपलो. काही मित्र सकाळी लवकर उठून महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले. साधारण ८ वाजता आम्ही सिंधुदुर्गच्या दिशेने निघालो. कोल्हापूरहुन खाली तळकोकणात उतरायला ३ मार्ग आहेत, आंबोली, गगनबावडा आणि फोन्डा. आंबोली सगळ्यात सोपा मार्ग आहे पण तो निपाणीहून कर्नाटकातून खाली सावंतवाडीमध्ये उतरतो. कोव्हीडमुळे कर्नाटक सीमेवर कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट लागतो असे ऐकलेले. त्यामुळे कुठून जावे हे नक्की होत नव्हते. शेवटी धाडस करून आणि ऐकीव माहितीनुसार आंबोली घाटातूनच जायचे ठरले. चेकपोस्टला थोडीशी विचारपूस करून सोडण्यात आले. मग काय निपाणी-आजरा-आंबोली-सावंतवाडी-मुंबई गोआ महामार्ग – खवणे असा निसर्गरम्य प्रवास ११.३० वाजता पूर्ण केला.
खवणे पॅरॅडाईस – आमच्या रिसॉर्टवर पोहोचल्यावर जाणवले, हा होमस्टे अगदी मोक्याच्या ठिकाणी खवणे समुद्रकिनार्याच्या बॅकवॉटरवर बांधला आहे. एका बाजूला रिसॉर्ट आणि समोर संपूर्ण कांदळवन. निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य ठिकाण होते. जेवण होईपर्यंत सर्वजण खूप वर्षांनी तास- दिड तास मस्त क्रिकेट खेळलो आणि फ्रेश झालो. जेवणात फ्रेश सुरमई, प्रॉन्झ आणि सोलकडी मिळाली. मूळ्याची भाजी मात्र विशेष आवडली नाही कुणाला. जेवण करून तास-दोन तास मस्तपैकी झोपलो.
वेन्गुर्ला लाईट हाऊस – थोडीशी वामकोक्षी घेऊन आणि चहा पिऊन आम्ही वेन्गुर्ला लाईट हाऊसला जायचे ठरवले. साधारण १०-१५ किलोमीटरवर पाऊण तासाच्या अंतरावर वेन्गुर्ला गाव आहे. वेन्गुर्ला बीचनजीक डोंगरावर लाईट हाऊस आहे. गाडी पार्क केली आणि दोघा तिघांनी लिंबू सरबत प्यायले. साधारण १०० पायऱ्या चढून आपण वर पोहोचतो. पायऱ्यांवर सुशोभीकरणाचे काम चालू आहे. सुरक्षारक्षाकडून परवानगी घेऊन आम्ही वर गेलो आणि तेथून अथांग पसरलेल्या सागराचा नजारा दृष्टीमध्ये मावत नव्हता. खाली जमिनीवरील काळे खडक, आकाशात फिरणाऱ्या घारी आणि अस्ताकडे चाललेला सूर्य नजर वेधून घेत होता. थोडा वेळ घालवून आम्ही खाली परत आलो. येथे खाली असलेला सागर बंगला डच आक्रमकांनी काबीज केला असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व आहे. थोडा वेळ घालवून, लिंबू सोडा घेऊन आम्ही परत जायला निघालो. वेंगुर्ल्यात काही गरजेच्या वस्तू विकत घेतल्या आणि सूर्यास्तापर्यंत खवणे बिचवर पोहोचलो. २ मित्र माघारीच बसले होते, थोडा वेळ समुद्र किनारी घालवून रिसॉर्टवर परत गेलो आणि जंगी पार्टी केली.
कांदळवन सफारी – शनिवारी सकाळी साधारण ६ वाजता जाग आली आणि कांदळवनाच्या किनारी शांतपणे चहाचा आस्वाद घेतला. सकाळी सात वाजता कांदळवनाची सफारी बोटीने करायचे ठरले होते. साधारण अर्धा तास त्या बॅकवॉटरमध्ये आम्ही फेरी मारली. सुंदर आणि मोहक असे कांदळवन आहे हे. डिझेल बोट असल्यामुळे बोटीच्या आवाजाचा थोडासा त्रास झाला. साधी बोट असती तर अधिक मजा आली असती, परंतु ती चालवणेही अधिक कठीण झाले असते. येथील वनस्पती तोडायला मनाई आहे असे बोटवाल्या काकांकडून समजले. परत येऊन मस्तपैकी चहा – पोहे नाश्ता केला आणि आंघोळी केल्या.
वालावल – साधारण १५ किलोमीटरवर असलेल्या वालावरच्या लक्ष्मीनारायण मंदिराबद्दल एका विडिओमध्ये बघितले होते. आंघोळी झाल्यावर आम्ही त्या दिशेने निघालो. वाटेत परुळेमध्ये डिझेल भरले आणि पुढे निघालो. नागमोडी वाटा आणि आजूबाजूला ताडामाडाची झाडे असा नयनरम्य रस्ता होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही वालावलला पोहचलो. अतिशय सुंदर, शांत आणि तितकेच प्रसन्न असे कौलारू लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आम्ही आलो होतो. मंदिराच्या बाजूला नारळाच्या झाडांनी आणि इतर वनस्पतींनी वेढलेला सुंदरसा तलाव होता. तासन-तास या मंदिरात बसून ध्यान धरावे असे वाटत होते. तलावात आम्ही पाय सोडून बसलो आणि छोट्या माशांनी पेडीक्यूअर केले . मंदिरापाशी भक्तनिवासाचे काम चालले आहे. तासभर तेथे बसून आम्ही पुढे निघालो.
धामापूर तलाव – वालावलहुन पुढे १० किलोमीटरवर असेलेल्या धामापूरला १५-२० मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो. साधारण १०-१२ पायऱ्या चढून गेल्यावर, समोर आपल्याला भगवती देवीचे मंदिर दिसते आणि बाजूला प्रशस्त पात्र असलेला धामापूर तलाव. अप्रतिम असे दृश्य होते डोळ्यांसमोर. येथे बोटिंग सोय आहे, पण कदाचित कोविडमुळे बंद होती. तेथे काहीवेळ बसून आम्ही पुढे निघालो. मंदिराच्या बाजूस असलेल्या हॉटेल वजा खानावळीत जेवायचा विचार केला परंतु खूप गर्दी असल्यामुळे परत निघालो. बाहेर टपरीवर कोकम सरबत पिऊन उन्हाची लाही थोडी कमी केली. मिळालेल्या माहितीनुसार २० किलोमीटरवर असलेल्या कुडाळ गावात दुपारचे जेवण करायचे ठरले. कुडाळकडे जाताना कारली नदीवरील पुलावर थोड्यावेळ थांबलो आणि नदीचे संथ पात्र पाहिले. कुडाळमध्ये कोकोनट या हॉटेलमध्ये जेवलो. जेवण बरे होते परंतु सर्व्हिस मात्र संथ होती. साधारण ३ वाजता तेथून बाहेर पडलो. परत खवणेला जायचे कि निवती बीचवर जायचे यासाठी आमच्यात दोन मतप्रवाह होते. शेवटी आम्ही काही जण निवती बीचकडे निघालो आणि काही जणांनी रिसॉर्टवर जाऊन विश्रांती घेतली.
किल्ले निवती बीच – कुडाळहून आम्ही साधारण ३ वाजता परुळेमार्गे किल्ले निवती बीचकडे निघालो. साधारण ४ किलोमीटर आधी आपल्याला किल्ले निवती आणि भोगवे बीच असा फाटा लागतो. भोगवे बीचही मोठे आणि व्हाईट-सेंड बीच म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही चुकामुक व्हायला नको म्हणून निवती बीचच्या दिशेने निघालो. ४ वाजायच्या दरम्यान आम्ही किल्ले निवतीच्या एसटी स्टॅंडपाशी पोहोचलो. गाडी स्टँडला लावून, गावातील वस्तीतून या बीचकडे रस्ता जातो. वस्तीतून बाहेर पडल्यावर समोर एक मोठा खडकाळ सोनेरी डोंगर, मध्ये पांढऱ्या मातीचा छोटासा बीच आणि समोर अथांग समुद्र असे दृश्य आमच्या समोर होते. साऊथ ईस्ट देशांमधील एखादे छोटेसे बेट वाटत होते. डोंगराच्या एका बाजूने आम्ही थोडे वर गेलो आणि लांबवर पसरलेला समुद्र बघितला. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, सकाळच्या कोवळ्या किरणांनी येथील डोंगर अधिक सोनेरी दिसतो. तेथे थोड्यावेळ बसून आम्ही खाली उतरलो आणि डोंगराच्या विरुद्ध दिशेला जाऊन समुद्रातील काही खडकांवर बसलो. सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे डोंगराची सावलीही होती. समुद्राच्या लाटांशिवाय कुठलाही आवाज येत नव्हता. अर्धा पाऊण तास आम्ही समुद्राकडे शांत बघत बसलो. सर्व ताणतणाव तेथेच निघून गेल्यासारखे वाटत होते. काही वेळात बाकीचे मित्रही आले, बाजूच्या एका डोंगरावर समुद्रात थोडे चालून जाता येते. तेथे बसून सूर्यास्त बघितला आणि खाली आलो. आता थोडा अंधार झाला होता. समुद्रातील लाईट हाऊसवरील दिवे दूरवर चमकत होते. हा सगळा नजारा डोळ्यांमध्ये साठवून आम्ही रिसॉर्टच्या दिशेने परत निघालो. परत आल्यावर पुन्हा मासे, प्रोम्प्लेट आणि सोलकडी असा मेनू होता, शाकाहारी जेवणपण होते. जेवण झाल्यावर गाडी घेऊन डोंगरावर अंधारात काही गप्पा मारण्यात वेळ घालवला. अरुंद रस्ता असल्यामुळे गाडी फार वेळ पार्क करता येत नव्हती, त्यामुळे परत आलो आणि थोड्यावेळ गप्पा मारून झोपी गेलो.
सफर समाप्ती – रविवारी सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा कांदळवनाच्या शांततेचा अनुभव घेतला. नाश्त्यामध्ये मालवणी घावण्या आणि चटणी होती. नाश्ता करून साधारण सकाळी १० वाजता आम्ही खवणेहुन निघालो. तळकोकणातील फार वर्दळ नसणारे समुद्र किनारे, इथले नागमोडी रस्ते, नारळ-सुपारी-ताडामाडाची झाडे, छोटे मोठे नदीतलाव आणि एकूणच इथला सर्व निसर्ग आपल्याला सुंदर अनुभुती देऊन शहरी गोंगाटापासून दूर घेऊन जातो. येथील निसर्ग संपूर्ण अनुभवण्याकरिता कदाचित तीन दिवस अपुरे वाटले. शेवटी कुठलाही प्रवास कधीनाकधी संपत असतो आणि आयुष्यभराच्या आठवणी ठेऊन जातो. आमची हि सहल अशीच संपली होती. आम्ही पुण्याचा प्रवास सुरु केला. वाटेत कोल्हापूरमध्ये हॉटेल सातबारामध्ये भरपेट जेवण करून रात्री ८ पर्यंत घरी परत आलो, पुढचा प्रवास सुरु करण्याकरीता.
शीर्षक वाचून जरा विचित्र वाटले असेल, पण अगदी सहज सुचलेले शीर्षक आहे आमच्या सिंधुदुर्गच्या सहलीमध्ये आणि या प्रवासवर्णनाशिही त्याचा निकटचा संबंध आहे. या प्रवासवर्णनात मी प्रामुख्याने गेल्या ४ महिन्यात केलेले गिर्यारोहण आणि त्यानंतर केलेल्या सिंधुदुर्ग सहलीबद्दल लिहिले आहे. ऐतिहासिक नोंदी मात्र मी फारश्या लिहिल्या नाहीयेत, कारण तो माझा विषय नाहीये. परंतु या किल्यांच्या आसपासचा निसर्ग आणि त्यावेळचे काही अनुभव मात्र लिहायचा प्रयत्न केला आहे.
आपल्या सर्वांचे गेले १ वर्ष करोनामुळे मानसिक दृष्ट्या अतिशय तणावाखाली गेले. पायाला भिंगरी असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना हे वर्ष एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हते. त्यातच ऑफिस घरी आल्यामुळे, ऑफिसमधील ताणतणाव घरापर्यन्त येऊन पोहोचले आणि या सर्वात करोनापासून स्वतःला वाचवायचा संघर्ष. हे असे रटाळ जीवन कधीपर्यंत चालेल याचा काहीच अंदाज येत नव्हता. दिवाळीच्या दरम्यान साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल व्हायला लागले आणि सर्वजणच घरातून हळू हळू बाहेर पडायला लागले. मीही परिवारासोबत नाशिकची एक छोटेखानी सहल केली.
पुढे नोव्हेंबरमधील अशाच एका शनिवारी, गिर्यारोहणाच्या जुन्या आठवणी निघाल्या आणि वाटले उद्या रविवारी ट्रेक करायचा का? मला मुळात ट्रेकची फार आवड नाहीये, पण मित्र सोबत असले तर धाडस करतो आणि या वेळेला मोकळ्या हवेत श्वास घायची इच्छाही होती. आम्ही ४ जण नक्की झालो, जुन्नर तालुक्यातील हडसर गडावर जायचे नक्की झाले. आमचे सगळे ट्रेक साधारण आमच्यातील गिर्यारोहणाची आवड असलेला मंदार ठरवितो. मंदाररच्या सांगण्यानुसार सकाळी ४.३० ला निघायचे ठरले, म्हंणजे सकाळी ३.३० लाच उठावे लागणार होते. थोडेसे अघोरी होते सगळ्यांकरिता, पण त्यामागचे उद्दिष्ट अगदी बरोबर होते. सकाळी लवकर गड चढायचा आणि सूर्योबा डोक्यावर यायच्या आत खाली उतरायचे. पुढे ३ महिने आमचे हे कॅलेंडर फिक्स झाले.
दुर्ग एक- किल्ले हडसर / २९.११.२०२० – ठरल्याप्रमाणे ४.३० वाजता निघालो. यापूर्वी बहुतांशी ट्रेकला टाटा सफारी वापरायचो, कारण साधारण ६-७ जण असायचे. या वेळेला चौघेच असल्यामुळे छोटी गाडी घेतली आणि पुणे नाशिक महामार्गाला लागलो. साधारण दिड तासात, ६५ किलोमीटरवर नारायणगावामध्ये चहा प्यायला थांबलो आणि पुढे जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नरपासून १४ किलोमीटरवर, पेठेची वाडी हे पायथ्याचे गाव लागते. हडसर किल्ला चढायला २ वाटा वाचण्यात आल्या, एक हडसर गावातून असलेली अवघड अशी खिळ्याची वाट आणि दुसरी तुलनेनी सोपी अशी पेठेच्या वाडीतून (राजमार्ग). आम्ही साहजिकच राजमार्गाहून चढणार होतो. सकाळी साधारण ७ वाजता चढायला सुरुवात केली, समोर डोंगर दिसत होते पण गडावर जायचा मार्ग नक्की कुठला ते कळत नव्हते. थोडे पुढे गेल्यावर मात्र मार्ग दिसला, साधारण तासाभरात आम्ही गडावर पोहोचलो. चढाईच्या शेवटच्या भागात दगडात कोरलेल्या सुबक पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर, गडाच्या एका बाजूला भगवा फडकताना दिसला. आम्ही त्या दिशेने गेलो आणि माणिकडोहाच्या जलाशयाचे मोहक असे दृश्य दिसले. काही वेळ घालवून, नंतर बाकीचा गड बघितला. त्यामध्ये पाण्याची टाके, नानाचा वाडा, धान्याचे गोदाम आणि शिव मंदिर होते. फार कोणी आलेले नसल्यामुळे, गडावर निःसीम शांतता होती आणि तेथील काही खडकांवर बसून आम्ही त्या शांततेचा अनुभव घेतला. आमच्यातील एका मित्र (मंदारला) खिळ्याची वाट बघायला काहीसा पुढे गेला. काही वेळाने आम्हीही त्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर, मंदिराचे काही भग्न अवशेष, पाण्याची आणखी काही टाके आणि भगवा दिसला. डोळ्यांसमोर आजूबाजूच्या सह्याद्रीचे विहिंगम असे दृश्यही दिसत होते. पुण्यातील एक तरणेला मुलगा, एकटाच ती खिळ्याची वाट चढून येताना दिसला. आमच्यातील दोन मित्रांनी, थोडेसे खाली उतरून वाट किती अवघड आहे याचा अंदाज घेतला. एव्हाना साधारण सकाळचे ११.३० झाले होते आणि आम्ही परत राजमार्गाने उतरायला सुरुवात केली. त्याच वेळेस मुंबईची २ मुले खिळ्याच्या वाटेने उतरणार असल्याचे कळाले. मंदारला मोह आवरला नाही आणि धाडस करून तो खिळ्याच्या वाटेने उतरला. आम्ही बाकीचे मात्र राजमार्गाने उतरून, हडसर गावाच्या पायथ्याशी मंदारला भेटायचे ठरवले. आम्ही हडसरच्या पायथ्याशी पोहचेपर्यंत मंदार गड उतरलाही होता. आम्हाला भेटल्यावर त्याने प्रांजळपणे कबूल केले, मार्ग अतिशय अवघड आणि थरारक होता. कड्यावर ठोकलेल्या खिळ्यांवरून उतरायला लागले. कदाचित या वयात, हे साहस करण्याची गरज नव्हती. परंतु मनुष्य जेव्हा एखादा निर्धार करतो तेव्हा निश्चयाच्या जोरावर तो पूर्णही करतो. त्याचाच आनंद मंदारच्या चेहऱ्यावर दिसत होता. येताना पहाटेचा अंधार असल्यामुळे आजू बाजूचा निसर्ग फार दिसला नव्हता. आता परतीच्या प्रवासात मात्र माणिकडोहाच्या जलाशयाचे मोहक दृश्य आकर्षित करत होते. डोंगरावरुन एक निमुळती वाट जलाशयाकडे जात होती, आम्ही त्या वाटेने जलाशयाच्या काठाशी गेलो. ऐन दुपारी १२ वाजता आम्ही काठाशी काही वेळ घालवला आणि परत प्रवास सुरु केला. वाटेत नारायणगावात “भुजबळ बंधूंच्या हॉटेल श्रीराजमध्ये” भरपेट जेवण केले आणि ५ पर्यंत घरी परत आलो.
दुर्ग दोन- किल्ले कमळगड, वाई – ५.१२.२०२० – डिसेम्बरचा पहिला आठवडा सुरु झाला आणि मंदारने नवीन गडाची योजना आखली. या वेळेला आम्ही जाणार होतो, सातारा जिल्ह्यातील वाईमधील कमळगडावर. माहितीतले ठराविक गड सोडले तर मला गड-किल्ल्यांबद्दल फारशी माहिती नाही आणि ऐतिहासिक नोंदीही माहित नाही. मंदारने सर्व महत्वाचे किल्ले यापूर्वी केले असल्यामुळे, न केलेल्या गड किल्यांवर जायची त्याची योजना होती. या वेळेला आणखी नोंद घ्यायची म्हणजे, मंदारचा १० वर्षाचा चिरंजीव छोटा सोहमही ट्रेकला आला. पुढच्या सगळ्या ट्रेकमध्ये सोहम आमच्याबरोबर अगदी उत्साहाने येत होता. बाकी यावेळेलाही मागचाच गृप होता. मागच्या वेळेप्रमाणे या वेळेसहिआम्ही 4.३० ला निघालो. वाई सोडल्यानंतर कृष्णा नदीवरील धोम धारण पार केले आणि पुढे नदीचे मोठे पात्र लागले. नदीवर पसरलेल्या धुक्याची दुलई आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वत रांगावरून नजर हटत नव्हती. नजरेत ते दृश्य साठवून आम्ही पुढे निघालो. गूगलमॅपनुसार आम्ही कमळगडाच्या पायथ्याशी तोंडवली गावाला जाऊन पोहोचलो. या गडावर जायलाही दोन मार्ग आहेत, एक नांदिवली गावातून सोपा मार्ग जो जावळीच्या वनातून जातो आणि दुसरा मार्ग तोंडवली गावातून तुलनेने अवघड असा. यावेळेला मात्र चुकून आम्ही अवघड मार्गाला येऊन पोहोचलो. तोंडवली गाव हे महाराजांचा मावळा जीवा माहालचे मूळ गाव. सध्या इथे स्मारकाचे काम चालले आहे. देवळाशी गाडी लावून आम्ही गड चढायला सुरुवात केली. थोडेसे चढल्यावर खालील कृष्णा नदीचे विस्तृत पात्र, त्यातून दिसणारा सुर्योदय आणि कोवळ्या सूर्यकिरणांनी सोनेरी दिसणारे डोंगरावरील गवत लाजवाब असा नजारा होता. आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली आणि जाणवले पुढची वाट उभी, अरुंद आणि थकवणारी आहे. थोड्या वेळाने मात्र जाणवायला लागले काही तरी चुकत आहे, त्यातच आजूबाजूचे गवत काट्यासारखे हातापायांना टोचत होते. काही अंतर पार केल्यावर एका मंदिरापाशी येऊन पोहोचलो. पुढे सरळच्या सरळ सुळके दिसत होते आणि उजव्या बाजूला लांब एक घर दिसत होते. त्याबाजूला काही मुले चढताना दिसत होती, परंतु ते रस्त्यामध्येच अडकल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या बाजूला काही कातकरी सुळके चढताना दिसत होते, परंतु तो मार्ग काही सुरक्षित वाटत नव्हता. अखेर देवाचे नाव घेऊन घराच्या दिशेने निघालो आणि अर्ध्या तासामध्ये जंगलातील मार्गातून त्या घरापाशी पोहोचलो. तेथे गेल्यावर कळाले गडाला पोहोचायला अजून तासाभराची अरुंद चढण आहे. चालत असताना बाजूला असलेले दोन जुळे गड दिसत होते. थोडयाश्या अवघड अश्या पायवाटेने पुढे आल्यावर एक छोटा कडा लागला. पुढचा गड पूर्ण करायचा तर हा कडा चढणे आवश्यक होते आणि परतीचा प्रवास शक्य नव्हता. जीव मुठीत धरून मित्रांच्या मदतीने तो कडा चढलो आणि नंतर जाणवले याला उतरायचेही आहे. आणखी काही मैल प्रवास करून, एका पठारावर पोहाचलो. तेथील काही आदिवासी बांधवानी केलेली शेती नजर वेधून घेत होती. रंगांची संपूर्ण उधळण होती. निळे आकाश, हिरवीगार शेती आणि उन्हाने तपकिरी झालेले गवत. काही फोटो काढून उरलेल्या गडाची चढाई पूर्ण केली. या गडाला एखाद्या किल्ल्यापेक्षा टेहळणी बुरुज म्हणून जास्त महत्व असावे. एका बाजूला जावळीचे घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला कृष्णेचे पात्र. विलक्षण, थरारक आणि तितकेच मोहक दृश्य होते. गडावरील रहस्यमय अशी कावेची विहीर जिने उतरून, खाली जाऊन बघितली. एव्हाना दुपारचे १२.३० वाजलेले. पुन्हा थोडे खाली उतरून त्या शेतातील एका झाडाखाली, घरातून आणलेली थालपीठे खाल्ली आणि उतरणीचा प्रवास सुरु केला. सोप्या जंगलातील मार्गाने जावे का पुन्हा तो कडा उतरावा असा विचार केला. परंतु कड्यावरुनच उतरायचे ठरवले. पुन्हा एकदा मित्रांच्या साहाय्याने उतरलो. मध्ये लागलेल्या घरात थंडगार ताक प्यायले आणि ४ वाजेपर्यन्त पूर्ण गड उतरलो. हा गड मात्र पूर्णपणे थकवणारा होता. उतरलेली बाजू थोडी वेगळी असल्या कारणाने, थोडे पुढे जाऊन गाडी घ्यायची होती. अंगात अजिबात त्राण उरला नव्हता, पण उसने अवसान आणून गाडी घेतली आणि परत निघालो. अवेळी निघाल्यामुळे रस्त्यात हवे तसे जेवण मिळाले नाही. वाकडला आल्यावर रंगला पंजाब या हॉटेलमध्ये जेवण करून रात्री ८ पर्यंत घरी परत आलो.
दुर्ग ३ – किल्ले पेब (विकटगड) – १२.१२.२०२० – पुणे आणि सातारा जिह्यानंतर यावेळेला रायगड जिल्ह्यातील पेब किल्ला करायचे ठरले. आणखी तीन मित्र येणार असल्यामुळे, साहजिकच दोन गाड्या घेतल्या. पुणे-मुबई द्रुतगतीमार्गाने नेरळमार्गे साधारण अडीच तासात माथेरान पार्किंग पॉइंटला पोहचलो. वाटेत धोकादायक अश्या माथेरान घाटामध्ये, काही उत्साही कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता व्यायाम करताना दिसले. गाड्या पार्क करून माथेरान रेल्वे रुळावरून चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये कड्यावरचा गणपती पाहावयास मिळाला. माथेरानपासून साधारण पाऊण तास चालल्यावर एक कमान लागते, तेथून पेब किल्याची वाट सुरु होते. एक शिडी उतरून आणि पुढे २ शिड्या चढून आणखी तासाभरात गडाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. कमानीपासून गडाच्या शेवटच्या टोकापर्यंतची पूर्ण वाट अतिशय अरुंद अशी आहे आणि एका बाजूला खोल दरी आहे. गडावर गेल्यावर पेब देवीचे मंदिर आणि पाण्याची दोन टाके दिसली. पुरातन वास्तूंचे काही भग्न अवशेषही दिसतात. शेवटची शिडी चढल्यावर कडयाच्या टोकाला दत्ताचे मंदिर नजीकच्या काळात बांधले आहे. थोडे दमट वातावरण असल्यामुळे, आजूबाजूचा निसर्ग स्पष्ट दिसत नव्हता. परंतु अधून मधून सूर्याने दर्शन दिल्यावर मात्र निसर्गाची चौफेर उधळण दिसत होती. येताना वाटेत बाजूला कलावंतीण दुर्गही दिसला. शेवटच्या टोकाला पोहोचल्यावर अचानक तिथे १०-१२ माकडे आली आणि आम्ही निघायचे ठरवले. गडावर पोहचायचा मार्ग मुख्यतः उतार आहे, परतीच्या प्रवसात मात्र पूर्ण चढण लागले. कोकणच्या दमट वातावरणामुळे शरीर शुष्क पडले. साधारण दिड तासात आम्ही पुन्हा माथेरानला पोहोचलो आणि तिथल्या ट्राफिक जॅममधून गाडी काढत परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत सोमाटणे फाट्याजवळ भजनसिंग ढाब्यावर जेवण केले आणि ४ पर्यंत घरी परतलो.
दुर्ग ४ – किल्ले घनगड – १९.१२.२०२० – मागील ३ किल्ले झाल्यावर, एखादा छोटेखानी ट्रेक करू असे ठरले. जिथे सर्व मुलांना पण नेता येईल आणि घनगडावर जायचे ठरले. या वेळेला सोहमसोबत सई , मुक्ता व अर्जुन यांनाही न्यायचे ठरवले. अजून एक मित्रही यावेळेला आला. लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरून रस्ता घनगडाकडे जातो. रस्त्याचा शेवटचा भाग खराब आहे. घनगड रायगड जिल्ह्यात येत असला तरी मुळशीपासून जवळ आहे. साधारण पहाटे ६ वाजता आम्ही घनगडाच्या पायथ्याशी म्हणजेच ऐकोले गावात पोहोचलो. धुक्यात दिसणारे गडाचे समोरील दृश्य हे अगदी मनमोहक होते. मुलांसकट गड चढायला साधारण पाऊण तास पुरला. शेवटच्या टोकाजवळ गेल्यावर एक शिडी चढायला लागते आणि थोडा निमुळता कडाही आहे. थोडासा अवघड भाग आहे हा. वर गेल्यावर चारही बाजूला जो निसर्ग दिसत होता, तो मात्र अप्रतिम आणि लाजवाब होता . गेल्या ३ किल्यांच्या तुलनेत हा गड छोटा होता परंतु इथून दिसणारा निसर्ग अद्वितीय होता. पावसाळ्यात हा भाग अधिकच सुंदर दिसत असेल. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची एक ते दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. थोडीशी न्याहारी केली आणि निसर्ग डोळ्यात सामावून परत निघालो. मुलांनीही मजा केली. परत येताना तळेगावजवळ थंडा मामला या हॉटेलात जेवण केले. आणि ४ पर्यंत घरी पोहोचलो.
हा प्रवास किंवा गिर्यारोहण करताना एक मात्र नक्की जाणवले, संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा आणि आजूबाजूचा निसर्ग हा थक्क करणारा आहे. यामध्ये महाराजांनी त्याकाळी अतिशय मोक्याच्या ठिकाणी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेले किल्ले, त्याकाळातील स्थापत्यशास्त्रहि किती प्रगत होते याचे उदाहरण देतात.
पुढे २५ डिसेंबरच्या दरम्यान आमच्यापैकी तीन मित्रांनी सापुतारा – वणी – इगतपुरी अशी सहल केली. परत आल्यावरही काही वैयक्तिक कारणास्तव मला सोलापूरला जावे लागले. या सर्वांमध्ये आमच्या दुर्गसफरीमध्ये थोडा खंड पडला. परंतु या खंडानंतर आम्ही आमची दुर्गसफर पुन्हा सुरु केली आणि त्याचा शेवटहि अतिशय रम्य आठवणींनी केला. या भागातील हि सफर मात्र इथेच संपवून, पुढचा प्रवास नवीन भागामध्ये तेवढयाच उत्सहाने पुन्हा लिहितो. धन्यवाद.
आज नवीन आठवडा सुरु झाला आणि लगेचच शनिवारची वाट बघायला सुरुवात केली. शनिवार प्रत्येकालाच हवा असतो कारण परत उद्या सोमवार येणार नसतो. खूप सुंदर भावना असते ती. मला अजून एक कारण आहे शनिवारची वाट बघायची. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर व्हाट्स-अपवर चौकात येण्यासाठी थम्सअप यायला सुरु होतील आणि 8 वाजता पुन्हा एकदा मैफल सुरू होईल. तो साधारण एक तास गेलेल्या आठवड्याचा पूर्ण क्षीण घालवतो आणि पुढच्या आठवडयाची संजीवनी देतो. राजकारण, सिनेमा, खेळ, हसणे खिदळणे आणि बरेच काही. वर्षानुवर्षे तोच पॅटर्न पण दरवेळेला तेवढेच ताजेतवाने करणारा तो एक तास. अनेक वर्षे गेली, बोलवायची पद्धत बदलली, बसायची वेळ कमी झाली, काही मित्र दूर गेले आणि म्हणता म्हणता चाळीशी पार झाली पण अजूनही आमचा चौक आहे तसाच आहे. अगदी करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आजच्या अनिश्चिततेच्या काळातही आम्ही तितक्याच नेमाने दर शनिवार रविवार भेटत आहोत.
गोआ 2003
आमची मैत्री हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय आहे. मी तर म्हणतो, आज मी जे काही आहे ते माझ्या मित्रांमुळे. त्याला तसे कारणहि आहे. आमच्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात कमी-अधिक यशस्वी झाला. परंतु आम्हाला कुणालाच कधी एकमेकांचा मत्सर वाटला नाही, प्रेरणा मात्र सगळ्यांनी घेतली. एकमेकांना बघून पुढे जायची. या दोन संलग्न वाक्यात खूप बारीक रेघ आहे आणि आम्ही सर्वांनी ती कायम ओळखली. आज साधारण १०-१५ “मेंबर” असलेल्या आमच्या ग्रुपची गोष्ट सुरु होते ३७ वर्षांपूर्वी ई.स.१९८३ साली पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड नगरपालिकेतील यमुनानगर या वसाहतीतुन.
१९८३ च्या दरम्यान माझे वडील पुणे आकाशवाणीमध्ये कामाला होते. मी शिशु वर्गात होतो आणि माझा मोठा भाऊ चौथीत होता नूमविमध्ये. पुण्यामध्ये घर परवडत नव्हते, म्हणून त्यांना कुठे तरी माहिती मिळाली पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे स्वस्त घरे मिळतात. ४५,००० रुपये कर्ज काढून वडिलांनी यमुनानगर येथे ९९वर्षाच्या लीजवर २ खोल्यांचे घर घेतले. लवकरच आम्ही तेथे राहायलाही आलो. त्यावेळीस निर्जन अशा या परिसरात काही ठराविक कुटुंबे राहायला आली होती. आम्हा चौघा मित्रांचा परिवारही यातीलच. साधारण सारखी परिस्थिती असलेला, नव्वदिच्या दशकातील मध्यमवर्गीय परिवार. आमची मैत्री कशी झाली माहित नाही, कदाचित आम्ही चौघेच साधारण एका वयाचे होतो आणि किंवा कदाचित दुसरा कुठला पर्यायहि नव्हता त्या निर्जन परिसरात. प्रत्येक मित्रपरिवारमध्ये एखादा लीडर असतो तसा आमच्यामध्ये मंदार होता. माझ्या आणि आशिषपेक्षा वयाने मोठा आणि गुंड्यापेक्षा उंचीने मोठा. तो जे जे म्हणायचा आम्ही सगळे ते करायचो.
आमची मैत्री पुढे सरकायला लागली, वेगवेगळे खेळ आम्ही खेळायला लागलो. गोट्या, भवरे, मधला कावळा, लपाछपी, लिंगोरचा,क्रिकेट ते अगदी कचराकुंडीतुन वेगवेगळ्या काड्यापेट्या जमा करणेसुद्धा. दुर्दैवाने खेळ माझ्या अंगातच नव्हता, पण प्रयत्न मात्र करायचो आणि सगळ्यात हरायचो. अगदी जिंकलो तरी ते लपाछपीला घरी जाऊन लपून वगैरे. साधारण ४ वर्षांनी, पहिल्यापासूनच अतिशय अवली असलेल्या अभ्या म्हणजेच अभिजीतशी आमची मैत्री झाली. त्याच्याबरोबरच क्रिकेट खेळायला अजून दोन-तीन जण यायला लागले आणि आमची टीम मोठी व्हायला लागली. या सगळ्या कालावधीत लक्षात राहिलेल्या काही आठवणी, गोट्यांमध्ये हरल्यावर मिळालेले लांबलचक राज्य, अभ्या लेफ्टयाने फुलटॉसवर मारलेली छकडी आणि त्यामुळे फुटलेली ३५ रुपयांची भरून दिलेलीकाच, आमच्याकडूनच जिंकलेल्या गोट्या गुंड्याने आम्हाला विकणे आणि मंदारचे त्यावर चिडणे, आशिषचे लपाछपी खेळताना उलटे पडणे आणि हात फ्रॅक्चर होणे, मध्ये पाय टाकून शिकवलेली सायकल, मोठ्या व्यक्तीस उद्धट उत्तर दिल्याने गुंड्याने खाल्लेली कानशिलात, आशिषची एकमेव अशी रॉयल हंटर सायकल, हाय-कॅच पकडताना माझ्या डोळ्यावर पडलेला बॉल आणि कोणीही डॉक्टर नसल्याने कंपाउंडरने पुस्तकात बघून दिलेली गोळी, १०-१० रुपये काढून लागलेल्या क्रिकेट मॅचेस आणि जिंकलेल्या टीमला मिळालेला एमआरआय बॉल, अश्या बऱ्याच छोट्या मोठ्या आठवणी. खऱ्या अर्थाने म्हणतात ना रम्य ते बालपण.
मंदार पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायला लागला, समीरशी त्याची मैत्री कदाचित तिथेच झाली. हळू हळू मंदार वेगळ्या मित्रांमध्ये रमायला लागला. आशीषची त्याच्या शाळेतील मित्रांशी मैत्री वाढायला लागली, केदार त्याचा शाळेतील मित्र. माझी अभ्याशी मैत्री अधिक वाढली आणि त्याच्या मित्रांशीही. अभ्याचे मित्रही तेवढेच अवली आणि चमत्कारिक. त्यातील पिंट्या ठळकपणे आठवणारा. अंघोळ न करता गळ्यापासून मानेपर्यंत मातीचा थर. त्याचे खेळही चमत्कारिक, नाल्याच्या पाण्यामध्ये गळ टाकून घाणेरडे मासे पकडणे वगैरे. आणि दुसरा मित्र शैलेश, आईच्या लाडामुळे मुलीचा आवाज काढणारा आणि नंतर आवाजही तसाच झालेला.
काळ पुढे सरकत होता, साधारण १९९४ च्या पुढे-मागे आम्ही सगळेच दहावी झालो. प्रत्येकाने आपापला मार्ग स्वीकारला. थोडे आम्ही सर्वच एकमेकांपेक्षा दूर गेलो, कदाचित मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरवात करण्याकरिता. साधारण १९९७ साली माझा डिप्लोमा झाल्यावर आम्ही पुन्हा एकत्र जमायला लागलो, आमच्या नवीन मित्रांसह. समीर, अजित, केदार, सुशील, कोकाटे, प्रदीप, मनीष, नितीन, बेके, सागर आणि वैभव. आमचा नवीन रिफ्रेश ग्रुप तयार झाला – “यमुनानगर चौकाचा”. साधारण आम्ही सर्वजण 18-१९ वर्षाचे होतो, अगदी तरुण मुले. मी डिप्लोमा झाल्या झाल्या लवकर कामाला लागलो होतो, बाकी सगळ्यांचे महाविद्यालयीन शिशक्षण चालले होते. या ग्रुपचे अजून एक वैशिष्ट्य होते प्रत्येकजण वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण घेत होते. मंदार-गुंड्या-अजित-मनीष-बेके हे वाणिज्य शाखेचे अर्थात कॉमर्स गॅंग, अभ्या कॉम्पुटर, सम्या मेकॅनिकल, केद्या इलेक्ट्रॉनिक्स हे पूर्ण इंजिनीअर आणि मी,आशिष, सुशील, कोकाटे आणि नितीन डिप्लोमा. त्यामुळे वादाला पूर्ण वाव होता.
आमचे क्रिकेट- खूप लाईफ सिम्पल होती, साधारण संध्याकाळी ७ वाजता आम्ही जमायला लागायचो. त्यावेळेला मोबाइल नसल्यामुळे प्रत्येकाच्या बिल्डिंगखाली जाऊन ओरडून हाक मारायचो. आम्ही पालिकेच्या मैदानावर फ्लड लाईट्समध्ये क्रिकेट खेळायचो. मला वैयक्तिक रित्या खूप खेळता आले नाही कधी, पण एकत्र जमून खेळायचा जोश खूप असायचा. त्या काळात मंदार आणि समीरचे कुठल्यातरी शुल्लक कारणावरून भांडण झाले होते आणि ते एकमेकांशी बोलायचे नाहीत. त्यामुळे साहजिकच मोस्टली समीर आणि मंदार वेगवेगळ्या टीममध्ये असायचे आणि त्यांची खेळताना जबरदस्त जुगलबंदी असायची. याशिवाय त्यावेळच्या काही क्रिकेटिंग आठवणी, सुशील-नितीन-मंदारचे क्लीन हिट्स, गुंड्याचा ऑलराऊंडर ओव्हरकॉन्फिडन्स, समीरचे धावा चोरणे, अभ्याचे फुलटॉस आणि वाईड आणि माझी फेकाड बॉलिंग. अजून एक प्रसंग आठवतो, एकदा आम्ही वेगळ्या संघाशी मॅच लावली होती आणि प्रत्येक संघाचे ठराविक खेळाडू असणार होते. समीर कॅप्टन होता त्या मॅचचा. आमचा अजून एक लहानपणीच जरासा विचित्र मित्र होता, त्या मॅचला तो स्लिपमध्ये उभा राहिला आणि एक विकेट पडली. तेव्हा अचानक अंपायरनि नोबॉल दिला, तेव्हा कळाले आमच्या टीममध्ये एक प्लेअर जास्त निघाला. एकही क्षण न घालवता सम्यानी त्या मित्राला डिसओन केले. त्यानंतर जे तो मित्र चिडला आणि जी शिव्याची लाखोली वाहिली, आजही आम्ही आठवून आठवून हसतो. एक मात्र नक्की आम्ही जे क्रिकेट त्यावेळेला खेळलो त्याला एकच उपमा देता येईल – एकदम हाय क्लास. गल्ली क्रिकेटहि तेवढ्याच आवेशाने खेळायचो आम्ही. आजूबाजूच्या लोकांना मात्र त्याचा त्रास व्हायचो. त्यातील पलांडे काका आठवतात. कायम बॉल त्यांच्या घरात जायचा आणि काका आमचा बॉल जप्त करायचे. त्यांना शत्रूपेक्षा कमी समजायचो नाही आम्ही. एकत्र बसून बघितलेल्या वर्ल्ड कप मॅचेस, सचिन-सौरव-द्रविड-मॅकग्राथ -अक्रम -शोएब जुगलबंदी, धमाल प्रवास सुरु झाला तारुण्याचा. एकदम धमाल. आमच्या इथल्या एका दुग्धालयात आम्ही एकत्र मॅचेस बघायचो बऱ्याचदा आणि तिथले गवळी गांगुलीला ज्या काही शिव्याचीं लाखोली व्हायचे बापरे. कदाचित काही शिव्या तिथेच शिकलो. अजून एक मजेशीर किस्सा आठवतो, वर्ल्डकप मॅचेस चालल्या होत्या आणि आपण ती मॅच हरायच्या बेतात असल्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळात होतो. आणि अचानक लोकांच्या घरातून आपण जिंकल्यासारखे आवाज येत होते. आम्ही इतके उल्हासित झालो कि एका अनोळखी घरात ५-६ जण घुसलो आणि मॅच पाहायला लागलो. आणि त्या घरातील लोक अचानक आलेल्या अनोळखी मुलांमुळे अवाक झाले.
आमचा गणेशोत्सव – मला आमच्या गणेश मंडळाचा इथे उल्लेख करायला खूप आवडेल. त्या वेळी अतिशय शिस्तबद्धपणे आम्ही 7 दिवस गणपती बसवायचो. प्रत्येक जण नेटाने आपली जवाबदारी पार पाडायचा. वर्गणी गोळा करण्यापासून, सजावट करणे, सात दिवस करमणुकीचे आणि सांघिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, वेगवेगळे वक्ते बोलावणे आणि शेवटी पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्याच्या गजरात गणपती विसर्जन. कालांतरानी आम्ही सगळे यमुनानगर सोडून दुसरीकडे राहायला गेलो आणि गणपतीमंडळात सहभाग कमी व्हायला लागला. आमच्या आधीच्या पिढीकडून आलेल्या या गणपती मंडळाचा वारसा पुढे मात्र कुणी चालवू शकले नाही.
गणपती १९९९
तारुण्याचा आमचा प्रवास सुरु होता, एक पडदा सिनेमाग्रहात बघितलेले सिनेमे, लपून छपून प्यायलेली दारू, विडिओ प्लेअर आणून पाहिलेले इंग्रजी सिनेमे, रात्री उशिरापर्यंत चौकात बसून टिंगल टवाळी करणे आणि वेगवेगळे ट्रेक्स आणि ट्रिप्स असे बरेच काही.
आमच्या सहली – आम्हा सर्वांनाच फिरण्यासाठी नवनवीन जागा शोधण्याची आवड असल्यामुळे, या काळात आम्ही वेगवेगळ्या सहलीहि केल्या. राजगड, रायगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, हरिहर, कलावंतीण सारखे ट्रेक (सगळ्यात मी नव्हतो), निर्जन ताम्हिणी घाट, निर्जन मावळ, एसटीतून केलेला नाणे घाट, माळशेज घाट, वरंदा घाट, शिवथर घळ, अहुपे घाट, मढे घाट, अंदरबन, सोंडाईगड सारख्या आधी बाईक आणि नंतर सफारीमध्ये केलेल्या पावसाळी ट्रिप्स. हरिहरेश्वर, अलिबाग, महाबळेश्वर, गोआ आणि लेह-लडाखला केलेल्या अविस्मरणीय ट्रिप्स. यातील प्रत्येक क्षण हा आम्हा सर्वांना मित्र म्हणून जवळ आणत गेला.
हरिहरगढ 2019लेह लडाख २०१५अहुपे घाट २०१४
गेली ३५ वर्षे असलेली आमची मैत्री आजही घट्ट टिकून आहे. आमच्यात कधीच वाद झाला नाही असे नाही पण तो वाद कधी मैत्रीच्या पुढे गेला नाही. आजही जेव्हा कित्येकांना अमेरिकन ड्रीम्सची भुरळ पडते, तेव्हा वायटूकेच्या काळात दोन वर्षात परत आलेला अभ्या आणि गेली चार वर्षे अमेरिकेत राहून परतलेला आशिष हे एक घट्ट मैत्री काय देते ते सांगतात. आमच्या सर्वांच्या सहचारिणीहि आमच्या मैत्रीला, लग्नानंतर सुरु केलेल्या संसाराचा एक भाग समजतात. आमच्या नेहमीच्या मौज मस्तीमध्ये आमचे फॅमिली गेटटूगेदरहि तितक्याच आनंदाने साजरे होते. मी जसे सुरवातीलाच म्हणालो या मैत्रीने आम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध केले.
काळ बदलला आहे, छोट्या छोट्या घरांची जागा आता पॉश इमारतींनी घेतली आहे, सहज फुकट उप्लद्भ असलेल्या मैदानांची जागा स्पोर्ट कॉम्प्लेक्स नि घेतली आहे, १० जणांत एक असलेल्या बॅटीची जागा वैयक्तिक मोबाईलनी घेतली आहे, मुलांना योग्य स्वातंत्र्य देणाऱ्या पालकांची जागा लाड करणाऱ्या पालकांनी घेतली आहे. जे आम्ही केले ते करणे आता अपेक्षित नाहीये, परंतु एक इच्छा मात्र नक्की आहे गॅजेटमध्ये रमलेल्या आमच्या पुढच्या पिढीलाही असेच जिवाभावाचे मित्र मात्र नक्की मिळवावेत.
पुन्हा साधारण एक वर्षानी प्रवास वर्णन लिहायला घेत आहे आणि पुन्हा एकदा अतुल्य भारतावर. कधीतरी वाचण्यात आलेले, “डेस्टिनेशन इस नॉट इम्पॉर्टंट – जर्नी इस इम्पॉर्टन्ट”. मला त्यात काही शब्द ऍड करावेसे वाटतील “विथ हुम यू आर ट्रॅव्हललीन्ग इस अल्सो इम्पॉर्टन्ट” आणि या तिन्हीचा योग जुळून आला तर… मागच्या सहलीपेक्षा पूर्ण विभिन्न तरीही तितकाच सुंदर भारत बघण्याचा योग पुन्हा आला, दक्षिण भारत – तामिळनाडू.
मधल्या काळात नव्यानेच सुरु झालेल्या आंग्रीया क्रूझवर मुंबई-गोआ हि सहल केली. साधारण त्याच वेळेला यूट्यूबवर तामिळाडूमधील धनुषकोडी हि जागा बघितली आणि बघताच आपण इथे जायला हवे असं वाटायला लागले. एक दोनदा आमच्या व्हाट्स-अँप ग्रुपवर चर्चाही झाली परंतु निशिचत कधी ते ठरले नाही. साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली, धनुषकोडी हि जागा मनात निश्चित होती. परंतु फक्त एका ठिकाणाकरता एवढा खर्च करणं व्यावहारिक दृष्ट्या शक्य नव्हते. मग विचार केला मदुराई – रामेश्वरम – धनुष्कोडी हि छोटेखानी सहल ठरवू. दरम्यान काही मित्रांनी वैयक्तिक कारणास्तव येण्यास असमर्थता दाखवली. शेवटी आम्ही आणि अजून एक फॅमिली असं नक्की केले. मित्राच्या बायकोने प्रवासाची पूर्ण रूपरेषा ठरवली आणि काही अधिक माहिती घेऊन आमचा टेम्पल रन फायनल झाला. चेन्नई-कांचीपुरम-महाबलीपूरम-पॉंडिचेरी-चिदंबरम-थंजावर-त्रिची-मदुराई-रामेश्वरम-धनुषकोडी असा साधारण १२०० किलोमीटर्सचा प्रवास. एका निवांत दिवशी बुकिंग्स.कॉम /ट्रीवागो.कॉम/मेकमायट्रिप.कॉम या संकेतस्थळांवरून हॉटेल्स बुक केली. झूमकार वरून एक ठराविक पॅकेज बुक केले- महिंद्रा स्कॉर्पिओ.
## डीसक्लेमर एखादा सिनेमा सुरु होण्यापूर्वी जसे डीसक्लेमर देतात तसे मला सांगणे गरजेचे आहे, प्रवासातील मंदिरांची माहिती किंवा एखाद्या जागेची माहिती आम्ही तेथील प्रत्यक्ष ऐकीव गोष्टीवरून, माहिती फलकावरून किंवा काही ठिकाणी घेतलेल्या गाईडकडून घेतली. परंतु त्याला अचूकतेची जोड असण्याकरता इंटरनेट, मुख्यतः विकिपीडियावरून आणखी संदर्भ घेऊन ते जोडले आहेत. एखादी माहिती चुकीची असेल तर ती कृपया सांगावी म्हणजे ती अद्ययावत केली जाईल.
दिवस एक – प्रवास (पुणे – चेन्नई)– पाडव्याच्या दिवशी रात्री पुणे-चेन्नई असा प्रवास विमानाने पूर्ण केला. रात्र चेन्नईत एका खासगी होमस्टेमध्ये काढली.
दिवस २ – कांचीपुरम –सकाळी साधारण 7.३० वाजता चेन्नईतील एग्मोर स्टेशन पार्किंगमधून गाडी घेतली आणि नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालो. कांचीपुरमचे महत्व असे आहे कि मध्ययुगीन काळात कांचीपुरम हि पल्लव साम्राज्याची राजधानी होती. साधारण ११ वाजता आम्ही पहिल्या मंदिरापाशी पोचलो. कैलासनथर टेम्पल – स्थापत्यकलेतील आश्चर्य असे कैलासनथर मंदिर राजा नर्सिंहवर्मन दुसर्याने ०७ व्या शतकात बांधले.
कैलासनथर टेम्पलकैलासनथर टेम्पल
एकंबरेश्वर मंदिर – तिथून पुढे आम्ही कांचीपुरम मधील सर्वात मोठ्या अश्या एकंबरेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. थोडक्यात सांगायचे तर शंकराचे हे मंदिर नवव्या शतकात पल्लव साम्राज्याध्ये बांधले गेले. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची गणना पंचमहाभूत स्थळांमध्ये होते आणि हे मंदिर पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. इतर ४ स्थळं जल, अग्नी, वायू आणि अवकाश. चिदंबरम नटराज मंदिर अवकाशाचे प्रतिनिधित्व करते जिथे आम्ही पुढच्या प्रवासात जाणार आहोत. अजून एक आख्यायिका इथे ऐकायला मिळाली इथल्या अंगणातील ३५०० वर्षांपूर्वीच्या आंब्याच्या वृक्षाला ४ चवीचे आंबे ४ फांद्यांना लागतात. हे मंदिर आपल्याला भगवान शंकर आणि पार्वतीच्या (कामाक्षी देवीच्या ) अस्तित्वापर्यंत घेऊन जाते. इथे आम्ही टॅमरीन राईस (चिंचेचा भात) आणि राईस इडली द्रोणामध्ये खाल्ली. सर्वांना भरपूर आवडलं, पुढच्या सर्व प्रवासामध्ये सगळ्या मंदिरांमध्ये आमचा हा नियमित आहार झाला. (किंमत १० रुपये एका द्रोणाचे)
एकंबरेश्वर मंदिर
टॅमरीन राईस (चिंचेचा भात) आणि राईस इडली
एकंबरेश्वर मंदिराचे दर्शन होईपर्यन्त साधारण १.३० वाजले. जवळच ४ किलोमीटरवर श्री सर्वान्ना भवन या प्रसिद्ध तामिळ पारंपरिक हॉटेलमध्ये मिल्स (तामिळ थाळी ) आणि मिनी मिल्स (५ भात ) घेतली. कांचीपुरम हे गाव अजून एका गोष्टीकरता प्रसिद्ध आहे, “सिल्क साड्या”. तळपत्या उन्हात २ वाजता आम्ही ए.एस बाबुशाह या प्रसिद्ध साड्यांच्या वातानुकूलित दुकानात गेलो आणि २ तासामध्ये दोन साड्या खरेदी झाल्या. मी आणि मित्राने मात्र छान वातानुकूलित वातावरणात सोफयावर वामकोक्षी घेतली. तामिळनाडूमध्ये सगळ्या मंदिरांचे दर्शन सकाळी 9 ते २ आणि आणि ४ ते ७ या वेळात होते.
कामाक्षी अम्मन टेम्पल – हे मंदिर कामाक्षी देवी जे पार्वतीचेच एक रूप आहे त्याला समर्पित आहे. हे मंदिरहि पल्लव साम्राज्यामध्ये बांधले गेले. पार्वतीची अजून रूपे मीनाक्षी आणि अकिलनंदेश्वरी यांची मंदिरे अनुक्रमे मदुराई आणि तिरुचिरापल्ली इथे आहेत. असे म्हणले जाते कि, कामाक्षी देवीची पद्मासनामध्ये बसलेली भव्य मूर्ती शांती आणि उत्कर्षाचा आशीर्वाद देते.
वरदराज पेरुमल टेम्पल – आजच्या दिवसातील शेवटचे मंदिर आता करायचे राहिले होते. कामाक्षी मंदिरापासून जवळच ३ किलोमीटरवर असलेल्या महाविष्णूच्या या मंदिराला पोहचेपर्यन्त संध्याकाळ झाली होती. प्रसिद्ध गणिततज्ञ रामानुजांनी काही काळ या मंदिरात घालवला होता असे म्हणले जाते. भगवान पेरुमलांची भव्य मूर्ती आपल्याला या मंदिरात बघायला मिळते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ठ्य बघायला मिळाले, तलावात असलेल्या इथल्या एका वास्तूची दारे ४० वर्षातून एकदा उघडली जातात आणि दुसरी म्हणजे मुख्य मंदिरात असलेल्या लक्ष्मीच्या रूपातील सुवर्ण आणि रौप्य पाली. त्यांना स्पर्श केल्यावर आपली पापे निघून जातात अशी आख्ययिका आहे. कुठल्याही श्रद्धा आणि आस्था या विषयवार टिपणी करणार नाही कारण ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. दर्शन झाल्यावर बाहेर येऊन कॉफी घेऊन, आम्ही महाबलीपुरम्च्या दिशेने निघालो. पोहचे पर्यन्त खूप अंधार झाला होता. ओयो रूम्समधील छान अश्या एका रिसॉर्ट कम बंगल्यामध्ये बुकिंग होते आमचे, परंतु दिसायला छान असलेल्या या रिसॉर्टमध्ये काहीच सोयी नव्हत्या. पूर्ण रिसॉर्ट मध्ये १0-१२ बंगले होते आणि आम्ही दोनच फॅमिली. आम्ही विनंती करूनही एका बंगल्यामध्ये सोय झाली नाही आणि दोन वेगळ्या बंगल्यामध्ये आम्हाला ठेवले. जवळपास कुठलेही रेस्टोरंटहि नव्हते, प्रचंड पाऊस पडत होता. जवळपासच समुद्रही आहे हे जाणवत होतं. कसे बसे एक हॉटेल मिळाले, तिथे पोटभर जेवण करून आम्ही परत आलो.
वरदराज पेरुमल टेम्पल
दिवस ३ – महाबलीपूरमआदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी ८.३० वाजेपर्यंत अल्प न्याहारी करून (ओयो कृपा) आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच महाबलीपूरमच्या दिशेने निघालो. आम्ही महाबलीपूरमपासून साधारण १० किलोमीटर अलीकडे राहिलो होतो. आमचा पुढचा पूर्ण प्रवास साधारण निसर्गरम्य अशा ईस्ट-कोस्ट रोड वर होणार होता. सकाळपासूनच काळे ढग दाटून आले होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरूही झाला. डाव्या बाजूला विराट समुद्राचे दर्शन होत होते. या पूर्ण १० किलोमीटरच्या प्रवासात भरपूर रिसॉर्ट आहेत. साधारण १० वाजता आम्ही महाबलीपूरमला पोचलो. महाबलीपूरमचे दुसरे नाव ममल्लापुराम असेही आहे, ज्याचा संदर्भ पल्लव राजा नर्सिंहवर्मन १ जो महामल्ल म्हणून ओळखला जायचा यावरून ठेवले गेले. महाबलीपूरम सातव्या शकतील पल्लव साम्राज्याच्या दोन प्रमुख बंदरांपैकी एक होते. आर्थिक उत्कर्षाबरोबरच महाबलीपूरमची ओळख त्या काळात खडकातून कोरलेल्या युद्धस्मारक अशीही होती. संपूर्ण शहरामध्ये तुम्हाला एका खडकातून कोरलेले अनेक रथ, मंडपे, आणि मंदिरे बघायला मिळतील. आणि यावर प्रमुखतः द्राविडी आणि चिनी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसतो. आम्ही पोचलो तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. जवळच्याच एका दुकानातून छत्र्या घेतल्या कारण तामिळनाडूमध्ये मान्सूनचे २ हंगाम असतात आणि नोव्हेंबर महिना हा नॉर्थ-ईस्ट मॉन्सूनचा असतो. आम्ही ७०० रुपये ठरवून २ तास आणि महाबलीपूरमची तिन्ही महत्वाची स्मारके दाखवायला एक गाईड केला.
शोर टेम्पल (समुद्र तटावरचे मंदिर) – ७व्या शतकात उंचावर बांधलेल्या या मंदिरातून संपूर्ण समुद्रतट दिसतो, यावरूनच या मंदिराला शोर टेम्पल असे संबोधण्यात येते. अतिशय रचनात्मक असे हे मंदिर , ग्रॅनाईट ब्लॉकच्या साह्याने बांधण्यात आले आहे. १९८४ साली शोर टेम्पलची गणना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये झाली. इथल्या मंदिरात आता कुठलीही पूजा केली जात नाही पण इथली पाचही मोहक मंदिरे तुमचे मन वेधून घेतात. इथे गाईडकडून अजून एक आख्ययिका ऐकायला मिळाली, उत्तरेकडे गणपतीला लहानभाऊ मानतात, रिद्धी-सिद्धी या त्याच्या पत्नी आणि कार्तिक स्वामी ब्रह्मचारी. तेच दक्षिणेकडे गणपती हा मोठा भाऊ आणि ब्रह्मचारी. असो उत्तर आणि दक्षिण असा वाद जुन्या काळापासून आहे. अजून एक माहिती मिळाली, २००४ मध्ये आलेल्या सुनामीमध्ये बाकी सगळीकडे खूप नुकसान झाले परंतु शोर टेम्पलचे फारसे नुकसान झाले नाही आणि त्सुनामीची लाट जेव्हा आत गेली त्यावेळेस समुद्रातील उर्वरित मंदिरांचे दर्शन झाले. अजून बऱयाच आख्यायिका गाईडकडून ऐकायला मिळाल्या ज्या वेग-वेगळ्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
शोर टेम्पल
शोर टेम्पल
शोर टेम्पल
पांचरथ – शोर टेम्पल बघून आम्ही महाबलीपूरममधील आमच्या पुढच्या जागेकडे मोर्चा वळवला. पंचरथाची हि रचना पहिल्या नर्सिंहवर्मन राजाच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून उतरली होती. एका अखंड खडकातून ५ रथांचे कोरीव काम सहाव्या शतकात सुरु करण्यात आले. या स्थळालाही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखले जाते. एका आख्यायिकेनुसार याला पाच पांडव रथही म्हणले जाते. धर्मराज रथ, भीम रथ, अर्जुन रथ , नकुल-सहदेव रथ आणि द्रौपदी रथ. सर्व रथांचे कळस हे द्राविडी वास्तुकलेचे दर्शन घडवतात. परंतु या रचनांची पवित्र स्थळ म्हणून कधीच गणना झाली नाही कारण राजा नर्सिंहवर्मनच्या मृत्यूनंतर या रचना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. महाबलीपूरम मध्ये अजूनही आपल्या खडकातून कोरीवकाम करून मुर्त्या बनवण्याचे काम दिसत राहते. एका स्थानिक व्यक्तीकडून आम्ही छोट्या कोरीव काम केलेल्या दशावताराच्या मुर्त्या आठवण म्हणून घेतल्या.
पांचरथ
केव्ह टेम्पल आणि डिसेंट ऑफ गंगास – इथून पुढे आम्ही महाबलीपूरममधील आमच्या पुढच्या स्थळी पोचलो. ९६ X ४३ फीट आकाराच्या अखंड खडकावर गंगेच्या उगमाची कथा शिल्पातून कोरण्यात आली आहे. अशा इतर अनेक प्राचीन कथा इथल्या केव्ह टेम्पल्स मध्ये कोरल्या आहेत.या शिल्पाची निर्मिती हि पहिल्या नरसिम्हन राजाच्या पुलकेसीन राजावरच्या विजयाप्रीत्यर्थ झाली होती. इथली अजून काही अद्भुत शिल्पं आणि आकृती बघून आम्ही महाबलीपूरमचा प्रवास संपवला. जवळच एका हॉटेलमध्ये जेवलो.
महाबलीपूरमहुन आम्ही पॉंडिचेरीच्या दिशेने निघालो, जवळच मुलांना आवडेल अश्या शेल म्युसिअममध्ये गेलो. तिथे थोडी फार खरेदी केली आणि वर्चुअल गेम्स खेळलो. मुलांनी धमाल केली. महाबलीपूरम ते पॉंडिचेरी असा साधारण १०० किलोमीटरचा प्रवास २ तासामध्ये पूर्ण केला. हा ईस्ट कोस्ट कॉरिडॉरचाच भाग असल्याने निसर्गरम्य असा प्रवास होता. संध्याकाळी साधारण ६ च्या दरम्यान आम्ही पॉंडिचेरीला पोचलो. पॉंडिचेरीतील आमचे हॉटेल लॅव्हिश होते. स्विमिन्ग पूल असल्याने मुलांनीही संध्याकाळी तास-दीड तास मजा केली. २-३ दिवसाचा थकवा घालवायला पॉंडिचेरी हा परफेक्ट हॉल्ट होता. मग काय “खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे २ यार!” जेवण करून झोपायला गेलो, पुढच्या दिवशी आरामात उठायचे ठरले.
दिवस ४ – पॉंडिचेरी – पॉंडिचेरीमध्ये गोव्यासारखे रिलॅक्स होणे आणि मिळवलेल्या काही माहितीनुसार औरोबिंदो आश्रम, प्रोमेनाडे बीच आणि फ्रेंच कॉलनी असा प्लॅन होता. पॉंडिचेरी हि युनिअन टेरिटरी असल्यामुळे, तामिळनाडूमधून प्रवेश केल्यावर एन्ट्री परमिट कम्पलसरी असते. आदल्यादिवशी काढायचे राहिल्याने, प्रथम ते काढले (१२०० रुपये). झूम कारची डॉक्युमेंटेशन ठीक नसल्यामुळे थोडासा वेळ गेला. साधारण ११ वाजता आम्ही प्रथम औरोबिंदो आश्रम, पॉंडिचेरीमध्ये गेलो. स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये फारसा रस नाहीये, परंतु औरोबिन्दोनचे बरेच समर्पित भक्त इथे दिसले. त्या वास्तूमध्ये शांतता गरजेची होती, परंतु मुलांच्या गोंधळात अवघड होते. तिथे पुस्तक विकणाऱ्या एक अनुयायी मराठी होत्या, त्यांनी एका पुस्तकाची शिफारस केली ते घेऊन आम्ही निघालो. तिथे कळाले, पॉंडिचेरीपासून साधारण १० किलोमीटर अंतरावर २० स्क्वेअर-किलोमीटर परिसरात वसलेले ऑरोविल्ले नावाचे स्पिरिच्युअल गाव आपण बघू शकतो. मूळ ठिकाणापासून साधारण २ किलोमीटर चालल्यावर, आश्रमाने प्रचंड मोठे वर्तुळाकार आणि स्वर्ण रंगाचे मातृमंदिर बांधले आहे. असे ऐकले कि त्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर एका प्रकारचे तेज निर्माण होते. नीट बुकिंग करून आलो तर तिथे ध्यान धरता येते. आम्ही दुरून दर्शन घेऊन, काही फोटो काढून निघालो. आश्रम परिसरातच एका हॉटेलमध्ये जेवण केले. पॉंडिचेरीला परत आल्यावर प्रोमेनाडे बीचला गेलो. बाजूला फ्रेंच धाटणीची घरे आणि वॉल्कवे तुम्हाला आकर्षित करतात. मुलं समुद्रात छान खेळली आणि आम्ही दगडावर निवांत बसलो. हॉटेलवर जाऊन छोटीशी पार्टी केली आणि लहानपणीच्या रम्य आठवणीमध्ये २-३ तास कसे गेले कळलेच नाही.
फ्रेंच कॉलनी
फ्रेंच कॉलनी
दिवस ५ – चिदंबरम आणि थंजावर – सकाळी नाश्ता करून आम्ही साधारण ६५ किलोमीटर हा सव्वा तासाचा प्रवास प्रवास करून चिदंबरमला पोचलो. आता आम्ही समुद्रापासून थोडे आत आलो होतो. निघताना मी चुकून शॉर्ट्स घातलेली, त्यामुळे मला मंदिरात प्रथम प्रवेश मिळाला नाही. जवळच असलेल्या एका दुकानातून लुंगी विकत घेतली आणि मग प्रवेश मिळाला. चिदंबरम देवस्थान हे मुख्यतः भगवान शंकराचे नटराज अवतारातील मंदिर आहे. हि जागाही आपल्याला शंकराच्या अस्तित्वापर्यंत घेऊन जाते. या मंदिराची वास्तुकला हि कला आणि अध्यात्माची सांगड घालून जाते. मंदिराच्या भिंतीवर आपल्याला नाट्यशास्त्राच्या १०८ छटांचे दर्शन घडते. या मंदिरात फोटो काढायला सक्त मनाई आहे. आत गेल्यावर मंदिराच्या मध्यभागीच १०-१५ गुरुजी हवन करत होते आणि श्लोकांचे वरच्या स्वरांमध्ये पठण चालले होते. शांतपणे ते बघत, ऐकत बसावेसे वाटले. अतिशय अध्यात्मिक असा अनुभव होता तो. दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
चिदंबरम मंदिर
चिदंबरम मंदिर
थंजावर – आता पुढचा प्रवास आणखी मोठा होता साधारण ११० किलोमीटरचा, समुद्रापासून आजून आत. आत्तापर्यंतचा पूर्ण प्रवास हा अतिशय नयनरम्य असा होता, परंतु या प्रवासात थोडा कंटाळा आला. हा रस्ता सतत गावातल्या छोट्या गल्ल्यांमधून जातो आणि त्याबरोबरच ट्रॅफिक. पोचायला साधारण २.४५ ते ३ तास लागले. इतके दिवस वातावरणानेही छान साथ दिली होती, आता मात्र कडक ऊन होते. थंजावरला साधारण १ वाजता सूर्य अगदी डोक्यावर असताना पोचलो. आधी घेतलेल्या माहितीनुसार आर्यभवन या पारंपरिक हॉटेल मध्ये जेवलो. तिथली दिव्यभोजनं थाळी सगळ्यांना आवडली. थंजावरला यायचे महत्वाचे कारण होते तामिळनाडूमध्ये पसरलेले मराठा साम्राज्य. थंजावरवर शिवाजी महाराजांचे धाकटे सावत्र बंधू एकोजी महाराजांचे १६७४ पासून राज्य होते. त्याआधी थंजावर नाईकांच्या अधिपत्याखाली होते. ऐकीव माहितीनुसार अजूनही इथे साधारण १००० मराठा परिवार राहतात आणि मराठी / तामिळ अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. आम्ही प्रथम मराठा पॅलेसमध्ये गेलो. वास्तूमध्ये दारातच असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बघून खूप अभिमान वाटला. मनोर्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे, पर्यटकांकरिता प्रवेश बंद आहे. तिथे असलेला दरबार हॉल आणि संग्रहालय मात्र बघण्यासारखे आहे. दरबार हॉल नाईकांनी बांधला होता. संग्रहालयात अनेक प्राचीन वस्तू आणि मराठा साम्राज्यातले दस्तावेज बघायला मिळतात. थंजावरच्या भोसले साम्राज्याची वंशवळहि बघायला मिळते. त्याच वास्तूमध्ये साधारण २० मिनिटांचा थंजावरबद्दल माहितीपटही बघायला मिळतो. आवर्जून पाहावा असा आहे. अजूनही त्याचे एक महत्व वाटले भर उन्हात वातानुकूलित वास्तूमध्ये बसायचा अनुभवही सुखद असतो. याशिवाय थंजावर हे कलेसाठेही प्रसिद्ध आहे. इथल्या भोसले घरण्याचे कलेवर नितांत प्रेम होते. इथून पुढे आम्ही थंजावरमधील प्रसिद्ध अश्या ब्रिहदीश्वर मंदिरात गेलो. मंदिराच्या प्रवेश दारात असलेली अजस्त्र अशी नंदीची मूर्ती तुमचे लक्ष वेधते. या मंदिराची बांधणी पहिल्या चोला राजाने दहाव्या शतकात केली. हे मंदिर पूर्णतः द्राविडी संस्कृतीचे दर्शन घडवते. या मंदिराची गणनाहि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केली जाते. या मंदिराची बाहेरची भिंत हि मराठा साम्राज्यात बांधली गेली. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही थंजावरमधील हॉटेलमध्ये चेकइन केले. खालीच असलेल्या अद्यार आनंदा भवनमध्ये डोसा वगैरे खाऊन झोपी गेलो.
ब्रिहदीश्वर मंदिर
ब्रिहदीश्वर मंदिर
ब्रिहदीश्वर मंदिर
आर्यभवन
दिवस ६ – त्रिची आणि मदुराई – आज साधारण २००-२२५ किलोमीटरचा प्रवास करायचा असल्यामुळे आणि २ मोठ्या मंदिरांमध्ये जायचे असल्यामुळे सकाळी ७ वाजताच प्रवास सुरु केला. आमचा पहिला टप्पा होता कल्लनाई धरण – त्रिचीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर कावेरी नदीवर हे धरण बांधले आहे. या धरणाची निर्मिती चोला साम्राज्यात राजा कारिकलनने १०० बीसीला केली. कल्लनाई हा जलसिंचनाचा भारतातील सर्वात प्राचीन आणि जगातील चौथा प्राचीन प्रकल्प आहे. या धरणाची पुनःनिर्मिती ब्रिटिश अभियांत्रिक सर आर्थर कॉटन याने १८३९ साली केली. कावेरी नदीचे इथून मोहक दर्शन घडते. इथून पुढे आम्ही त्रिचीकडे निघालो. या धरणापासून त्रिची शहरापर्यंतचा रस्ता हा अतिशय निसर्गरम्य असा आहे. दोन्ही बाजूला केळी आणि भातशेतीचा हिरवा गालिचा, अतिशय सुंदर असा रोड आणि निळे भोर आकाश.
श्री रंगनाथस्वामी टेम्पल, त्रिची – भगवान महाविष्णूचे अवतार असलेल्या रंगनाथस्वामींचे हे मंदिर आहे . एकूण १५६ एकराचा मंदिर परिसर, ८१ छोटी मोठी देवळे, २१ गोपुरे, ३९ मंडप आणि पाण्याच्या अनेक छोटे मोठ्या टाक्या या मंदिर परिसराला भव्य बनवतात आणि तुमचे डोळे दिपून जातात. द्राविडी वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या या मंदिराची गणना जगातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरात होते. इथे चाललेली कीर्तने आणि हवन तुमचे लक्ष वेधून घेतात. मंदिरात असलेले माहूर आणि हत्ती तुम्हाला आशीर्वाद देतात. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही मदुराईच्या दिशेने निघालो.
श्री रंगनाथस्वामी टेम्पल
श्री रंगनाथस्वामी टेम्पल
मदुराई – त्रिची ते मदुराई हा १३८ किलोमीटर्सचा रस्ता पूर्णपणे चौपदरी आणि निसर्गरम्य आहे, त्यामुळे ड्रायविंग करायला मजा येते. साधारण दोन तासात आम्ही मदुराईला पोहोचलो. मदुराईला टेम्पल सिटी असेही संबोधले जाते. प्रथम हॉटेलमध्ये चेकइन केले आणि तासाभरात फ्रेश होऊन ५ वाजता मदुराईच्या प्रसिद्ध अश्या मीनाक्षी अम्मम मंदिरात जायला निघालो. मंदिराजवळ पार्किंग मिळणे अवघड असल्याने, आम्ही रिक्षाने जायचे ठरवले. साधारण 3 किलोमीटरच्या या अंतराला १०० रुपये घेतले. तामिळनाडूतील सगळ्यात प्रसिद्ध असे हे मंदिर असल्याने इथे अभूतपूर्व सुरक्षा आणि गर्दी होती. मंदिराच्या आवारात मोबाईल फोन आणि कॅमेरा न्यायला परवानगी नसल्यामुळे गेटवरच लॉकरमध्ये मोबाईल ठेवले. थोडे पुढे आल्यावर मंदिराचे उंचच्या उंच आणि विविध देवतांच्या रेखीव मूर्तींने सजलेले गोपुर नजरेत मावत नव्हते. मंदिरात प्रवेश केला आणि थेट दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. मीनाक्षी अम्मम हि पार्वती देवीचेच रूप आहे. साधारण तासाभरात आमचे देवीचे दर्शन झाले, तिथून पुढे शंकराचे दर्शन घेतले. अतिशय प्राचीन असे हे मंदिर, चारही दिशांना असलेली उंचच्या उंच गोपुरे आणि आतील प्राचीन शिल्पं अचंबित करतात. या भव्यतेने डोळे दिपून जातात आणि भारताचा प्राचीन इतिहास किती समृद्ध आहे याची जाणीव करून देतात. मंदिरातील प्रत्येक खांब, भिंतीवर असलेल्या चित्राकृतीं इतका लांबचा प्रवास सार्थकी लागल्याची जाणीव करून देतात. कुठलाही कॅमेरा नसला तरीही, तुमच्या स्मृतीमध्ये या आठवणी कायमच्या राहतात.
दर्शन घेऊन परत निघालो. रिक्षा मिळायला थोडा वेळ गेला, रिक्षा ड्राइवर आमची भाषा अजिबातच समजू शकत नव्हता, खाणाखुणाहि नाही. कसेबसे हॉटेल मध्ये पोचलो. हॉटेलचे रेस्टॉरंट विशेष नव्हते आणि हॉटेलहि विशेष नव्हते. थोडंफार जेऊन झोपलो.
मीनाक्षी अम्मम मंदिर
दिवस ७ – रामेश्वरम आणि धनुषकोडी – आज आमच्या या प्रवासाचे शेवटचे ठिकाण आणि ज्याकरता सर्व अट्टाहास केला त्या धनुषकोडी आणि रामेश्वरमला जायचे होते. रविवारचा दिवस होता. चेकआउट करून सकाळी ७ वाजता निघालो. मदुराई-रामेश्वरम-धनुषकोडी असा साधारण २०० किलोमीटरचा हा प्रवास आहे. थोडा चौपदरी आणि थोडा २ पदरी अश्या रस्त्यावर अफलातून निसर्ग पूर्ण प्रवासभर आपल्याला साथ देतो. अगदी रस्त्यावर संपूर्ण पिसारा फुलवलेला एक मोर अचानक आमच्या गाडीसमोर उडत आला. धनुषकोडीला ११-११.३० पर्यंत पोहचायचे, थोडा वेळ काढून रामेश्वरमला संध्याकाळी दर्शन घायचे असा प्लॅन होता. वाटेत ढाबा वजा टपरी मध्ये थांबून चहा प्यायला आणि दिवाळीचा चिवडा संपवला. साधारण ११ वाजता पाम्बन बेटाअलीकडच्या पाम्बन ब्रिजवर पोहोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाहुला निळ्या क्षार रंगाचा समुद्र, डाव्या बाजूला जवळजवळ पाण्यात गेलेला रेल्वेब्रिज आणि उजव्या बाजूला समुद्रातील नौका. डोळ्यात मावेनासे पोट्रेट होते. ब्रिजवर थांबायला पवानगी नाहीये, तरीही नियम मोडून सर्वजण फोटो काढत होते. आम्हालाही मोह आवरला नाही. पाम्बन ब्रिज हा भारतातील समुद्रावरचा पहिला आणि वरळी सी लिंक होईपर्यंत सगळ्यात लांब ब्रिज होता. १९१४ साली इंग्रजांच्या राज्यात बांधलेला हा ब्रिज मोठी जहाजे आली तर अपलीफ्ट होतो. या ब्रिजला एक दुःखाचीही किनार आहे, २३ डिसेंबर १९६४ साली आलेले अजस्त्र वादळ पाम्बन बेटाला धडकले तेव्हा ब्रिजवर असलेली पाम्बन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेन समुद्रात उलटली आणि ट्रेनमधील सर्व १५० प्रवासी मृत पावले. पुढे ३० किलोमीटर प्रवास करून रामेश्वरममार्गे धनुषकोडीला फोहोचतो. वाटेत डाव्या बाजूला डॉक्टर अब्दुल कलामांचे घर आणि नव्याने सुरु केलेले मेमोरियल लागले .
पाम्बन ब्रिज
धनुषकोडी – रामेश्वरमपासून जसजसे तुम्ही पुढे सरकता गूगल मॅपवर तुम्हाला रस्ता निमुळता होताना दिसतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र प्रत्यक्षही दिसायला लागतो. अखेर आम्ही धनुषकोडीला पोचलो. पण दुर्दैवाने भारताचे शेवटचे टोक जे पुढे ५ किलोमीटर आहे तेथे जायचा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला. असे सांगण्यात आले लाटा रस्त्यावर आल्याने दुरुस्तीचे काम चालले आहे आणि पुढे जाणे धोकादायक आहे. सर्व प्रवासी नाराज झाले. आमचाहि हिरमोड झाला. मग तिथल्या सुरक्षा अधिकाऱयांशी आणि स्थानिक लोकांशी विचारपूस करून असे ठरले कि ५ किलोमीटर चालत जायचे. ऐन दुपारी उन्हात चालायला मुले तयार नव्हती . मग ठरवले थोडं पुढे जाऊन बघू, वाटले तर परत फिरू. ठरलं तर मग, मुलांची समजूत काढून पुढे निघालो. उलट्या दिशेने लोक परत येत होते, सकाळी बस ने गेलेले आणि नंतर अचानक बसेस बंद झाल्याने परतीचा प्रवास चालत करत होते. विचारपूस केल्यावर काहीजण खूप लांब, काहीजण ५ किलोमीटर – १० किलोमीटर असं मनात येईल ते सांगत होते. कदाचित थकल्यामुळे त्यांनाही कळत नव्हते. शेवई कळाले टोटल ५ किलोमीटर आहे रस्ता, मग मात्र मनाशी निश्चय केला काही झाले तरी आता शेवटपर्यंत जायचे. मुलंही न चिडता चालत होती. हळू हळू निसर्ग बदलायला लागला. ढग दाटून आले. आम्ही मात्र स्वर्गवत अश्या एका रस्त्यावरून चालत होतो. रस्त्याच्या एका बाजूला बंगालचा उपसागर आणि एका बाजूला हिंद महासागर. निळ्या आणि हिरव्या अश्या दोन रंगाचे समुद्र आणि मध्ये एक निमुळता रस्ता. साधारण १ तास चालल्यावर शेवटच्या पॉइंटला म्हणजेच आरिचनमुनाईला पोहोचलो. दोन्ही समुद्र येथे एकत्र मिळत होते. कोणीतरी सांगितले दूरवर दिसत असलेला रामसेतू आहे. पावसाळा नसला तर बोटीने तिथपर्यंत जाता येते आणि उतरता येते. थोडावेळ थांबून परत निघालो. दाटून आलेले ढग आता काळे झालेले आणि पाऊस आमच्या दिशेने सरकत होता. थोडी भीती वाटली, एकीकडे समुद्राच्या लाटा दोन्ही बाजूने धडकण्याचा आवाज येत होता. पावसाची जोरात सर अली आणि आम्हाला भिजवून आमच्या समोर एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात निघून गेली. टोटल १० किलोमीटर चालून आम्ही परत मूळ जागी पोहोचलो. खूप दमलो होतो, अनन्नस आणि कैऱ्या एका अक्काकडून विकत घेतल्या. थोडीशी भीती, थोडी दमणूक पण “वॉल्क ऑफ द लाईफटाइम” होता तो. धनुषकोडीला हॉंटेड गाव संबोधले जाते आणि अजूनही १९६४ साली आलेल्या चक्रीवादळाच्या खुणा येथे दिसतात. वादळात उध्वस्त झालेले गाव आणि त्यावेळची पडक्या अवस्थेतील घरे भूतकाळातील जखमा ताज्या करतात.
धनुषकोडी
धनुषकोडी
धनुषकोडी
धनुषकोडी
रामेश्वरम – धनुषकोडीहून साधारण अर्ध्या तासात रामेश्वरमला आलो, जेवण करून हॉटेलमध्ये चेकइन केले. रामेश्वरमची हॉटेल प्रॉपर्टीही लॅव्हिश होती. थोडा आराम करून आम्ही रामेश्वरम मंदिरात पोहचलो. रामेश्वरमलाही मंदिरात मोबाइल आणि कॅमेराची परवानगी नाहीये. या मंदिराची गणना बारा ज्योतिर्लिंगामध्ये होते, त्यामुळे इथे अनेक भाविक तीर्थयात्रेला आले होते. या मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदही येऊन गेले आहेत. पहाटेच्या प्रहरी समुद्रात स्नान करून इथल्या २२ कुंडात स्नान केले तर पुण्य लागते किंवा पापे धुतली असे म्हणले जाते. मला परत म्हणावेसे वाटेल श्रद्धा आणि धर्म हि प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याला चूक आणि बरोबर अश्या विभागणी करू शकत नाही. परंतु मुख्य मंदिराच्या म्हणजेच शंकराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारात स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या उपदेशाचा सारांश आम्ही आमच्या दृष्टीने घेतला “मनात अप्रामाणिकता ठेऊन आणि कायम चुकीचे आचरण करून कुठलीही पापे धूतली जात नाहीत, उलट अश्याने ती पापे अधिक वाढतात. देव त्या व्यक्तीवर जास्त प्रसन्न होतो जो इतरांच्या मदतीला धावून जातो नाकी जो माणूस अपवित्र मनाने दररोज पूजा करतो”. मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही हॉटेलमध्ये परतलो. जवळच अप्पोलो क्लिनिक मधून काही हवी असलेली औषधे घेतली. रात्री लवकर जेऊन झोपलो.
दिवस ८ – परतीचा प्रवास रामेश्वरम – मदुराई – पुणे – सकाळी नेहमीप्रमाणे उठलो. मुलांनी हॉटेलमध्ये थोडावेळ स्विमिन्ग केले. साधारण ९ – ९.३० पर्यंत नाश्ता करून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. १ पर्यंत मदुराईला पोहोचलो. प्रसीद्ध अश्या मुरुगन इडली शॉप मध्ये डोसा – मिल वगैरे जेवलो आणि हां गेले काही दिवस दररोज जेवणात असलेला आपलमहि (तांदुळाचा पापड) खाल्ला. परिवाराला एरपोर्टवर सोडून आम्ही झूमकार परत केली. काही फॉर्मॅलिटी करायला लागतात हॅन्डओव्हरला. परंतु खूप सोपी प्रक्रिया आहे. मदुराई-चेन्नई-पुणे असा विमान प्रवास करून रात्री साधारण २ वाजता घरी परत आलो. कुठलाही सहल, प्रवास आणि मित्रांबरोबर घालवलेला वेळ मला न संपाव्याश्या वाटणाऱ्या स्वप्नाप्रमाणे वाटतात.असो पुढचे काही दिवस आम्हाला तामिळनाडूतीळ समृद्धअश्या इतिहासात रममाण ठेवतील आणि पुढच्या सहलीची योजना आखायचे लक्ष्य देतील. धन्यवाद.
पाहिल्यांदाच माझ्या लेखणीतून एखादे प्रवास वर्णन करत आहे, म्हणून थोडी प्रस्तावना. गेली 1०-१२ वर्षे भारतात आणि भारताबाहेरील सहली करण्याचा योग आला. संपूर्ण राजस्थान, हिमाचल, लेह-लडाख, कोस्टल कर्नाटक, हंपी-होस्पेट, ऊटी-कोडाईकॅनॉल, केरळ, गोआ, दुबई, सिंगापुर आणि अगदी मागच्या वर्षी श्रीलंका. याशिवाय पुण्याजवळील अनेक छोटी-मोठी ठिकाणे. यातील महत्वाची बाब म्हणजे हि ठिकाणे फिरताना बहुतांशवेळा जवळचा मित्र-परिवार बरोबर होता. गेली काही प्रवासवर्णने मित्रांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली, म्हणलं या वेळेला आपण लिहून बघू.
या वर्षी कुठे जायचे असा विचार केला तेव्हा भूतान किंवा नॉर्थ ईस्ट या पैकी एक पर्याय निवडू असे पक्के होते. बऱ्याच चर्चेनंतर मेघालय-आसाम-अरुणाचल असा भारतातील पूर्वेचा भाग नक्की केला. तारखा निश्चित होईना, अखेर नाताळच्या सुट्टीत जायच नक्की झालं. 2 मित्र, त्यांचा परिवार आणि आम्ही असे दहाजण नक्की झालो. लॅण्डमास्टर हॉलीडेसकडून प्रत्यक्ष ठिकाणे आणि तारखा पक्क्या झाल्या.
दिवस १-प्रवास – २२ डिसेंबर २०१८ ला आम्ही दहा जणांनी पुणे-दिल्ली-बागडोगरा-गुवाहाटी हा लांबचा विमान प्रवास पहाटे ४ ते दुपारी १ पर्यंत पूर्ण केला.
विमानतळावर १३ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर आम्हाला घ्यायला आली होती, पुढचे ११ दिवस आम्ही याच गाडीतून प्रवास करणार होतो. इथे आमच्या सहलीचा पहिला टप्पा सुरु झाला, गुवाहाटी ते चेरापुंजी व्हाया शिलाँग. साधारण १५० किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण करायला ५ तास लागतात, परंतु दुपारचे जेवण आणि क्रिसमसमुळे शिलाँगमध्ये असलेल्या ट्रॅफिकमुळे आम्हाला हा टप्पा पूर्ण करायला ८ ते ९ तास लागले. गुवाहाटी ते शिलॉंग हा रोड चौपदरी आहे आणि आजूबाजूची नयनरम्य दृश्ये आपल्याला सतत गाडीच्या खिडकीतून डोकावयास भाग पाडतात. मध्ये गाडी थांबली तेव्हा आम्ही इथल्या आंबट-गोड अननसाची चव घेतली. उमिअम लेकवर आम्हाला सूर्यास्त बघायला मिळाला. सर्व पूर्वेच्या राज्यांमध्ये या सुमारास सूर्योदय (साधारण ५.३०) आणि सूर्यास्त (साधारण ४.३०) लवकर होतो . उशीर झाल्यामुळे मेघायलायतून परताना इथे पुन्हा थांबू असे ठरले. रात्री उशिरा आम्ही कुटमदन रिसॉर्ट चेरापुंजी इथे थांबलो. हे रिसॉर्ट अतिशय सुंदर ठिकाणी आहे, जिथून खाली असलेल्या बांगलादेश व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते.
उमिअम लेक
बांगलादेश व्हॅली
कुटमदन रिसॉर्ट
दिवस २ – चेरापुंजी –स्थानिक भाषेमध्ये या गावाला सोहरा संबोधले जाते. अनेक छोटे – मोठे धबधबे, नदी-नाले, झाडं-झुडपे आणि शुष्कपणा अश्या दोन्हींनी नटलेल्या अजस्त्र पर्वतरांगा, थंड हवा आणि निमुळते रस्ते असा हा निसर्गरम्य परिसर. मेघायलायला स्कॉटलंड ऑफ ईस्ट असेही संबोधले जाते. परंतु कुठल्याही ठिकाणाला दुसया नावाने संबोधून त्याला छोटे करायला नको. हे भारताचे पूर्वेतील एक सुंदर राज्य. सध्याच्या ऋतूनुसार ३ ठराविक ठिकाणे करायचे आम्ही ठरवले. संपूर्णतः एक दुसर्यापासून विभिन्न. वेई सावंडोन्ग फॉल –मूळ जागी पोचल्यावर साधारण अर्ध्या तासाचा छोटेखानी ट्रेक करून या ठिकाणाला पोचता येते. त्यानंतर दिसतो तो हिरव्या पाण्याचा जंगलातील एक सुंदर डोह आणि त्यात पडणारा धबधबा. निसर्गाचा एक सुंदर तुकडा.
वेई सावंडोन्ग फॉल
अर्वाह केव्ह – अत्यंत रोहमार्शक रहस्यमय अश्या गुहा , तिथे पोचायचा रहस्यमय रस्ता आणि आतमधील पाण्याच्या प्रवाहाने झालेले fossils.
नोहाकालीकाई फॉल्सलापाहिलेला शीतल सूर्यास्त. या जागेचे नाव हे एका आख्यायिकेनुसार मेघालयीन स्त्रीचे दिले आहे. पावसाळ्यात इथला प्रवाह अजस्त्र असा असेल. थोडीफार ठोसेघरची आठवण होते.
हि तिन्ही ठिकाणे करता करता ४.३० वाजले आणि सूर्यास्त झाला. परंतु हॉटेलला जाईपर्यंत या तीनही ठिकाणी पोचायचा रस्ता, आजूबाजूचा निसर्ग आणि डोंगरदऱ्या तुम्हाला साद घालत राहतात. हॉटेलला पोचेपर्यंत थंडीचा कडाका आणखी वाढला होता, आम्हाला रिसॉर्टनि कॅम्पफायर लावून दिला. गप्पागोष्टी, भेंड्या आणि चविष्ट गरमागरम जेवण करत दिवस संपला.
दिवस ३ – मावलीलॉन्ग, डावकि आणि क्रांगसुरी फॉल्स आणि तिथून शिलाँगअसे डोंगरदऱ्यातील आणि घाटातील साधारण ३०० किलोमीटर अंतर संध्यकाळपर्यन्त पूर्ण करायचे होते. आम्ही सकाळी ७ वाजता नास्ता पॅक करून घेऊन निघालो. जाताना वाटेमध्ये काही गावांमध्ये स्नोफॉल झाला होता. मोहक असे दृश्य होते ते. पुढे घाट उतरून खाली आम्ही मावलीलॉन्ग गावाजवळ सकाळी ९ ला पोचलो. काही अंतर खाली उतरून झाडाच्या जिवंत मुळापासून तयार झालेला नदीवरील सेतू पाहिला (लिविंग रूट ब्रिज). मेघालयात असे अनेक छोटे मोठे सेतू आहेत. प्रसिद्ध असा हा त्यातील एक. या पेक्षा मोठा डबल डेक्कर ब्रिज आहे, परंतु तिथे पोचायचा ट्रेक थोडा अवघड असल्याकारणाने आणि सोबत फॅमिली असल्याने आम्ही केला नाही. परंतु एक दिवस अजून काढून तो नक्की करावा असे स्थानिक म्हणाले. तिथून पुढे आम्ही मावलीलॉन्ग या आशियातील सर्वात स्वच्छ गावामध्ये गेलो. अतिशय टुमदार असे हे गाव , याला गावापेक्षा अधिक एखादा फुलांचा बगीचा म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
लिविंग रूट ब्रिज, मावलीलॉंग
मावलीलॉंग व्हिलेज
मावलीलॉन्गहुन पुढे आम्ही डावकि या बांगलादेश सीमेवरील गावाला निघालो. डावकी गावातील उंगोट नदीचे पारदर्शक पात्र गेल्या काही दिवसापासून प्रसिद्ध झाले आहे. नदीतील बोटी इथे हवेत तरंगत आहे असे वाटते. साधारण १२०० रुपयाला १ तासाची नदीतील फेरी तुम्हाला बोटीतून मारता येते. अत्यंत सुंदर, स्वचछ, मोहक आणि तितकेच आश्चर्यकारक असे हे दृश्य.
डावकीला जायच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅममुळे थोडा वेळ गेला आणि पुढचा साधारण २ किलोमीटर रस्ता चालत गेलो. हे टाळायचे असेल तर थोडे अधिक लवकर प्रवास सुरु करणे गरजेचे आहे. या पुढचे आजचे शेवटचे ठिकाण क्रेंगशूरी फॉल्स. डावकिपासून साधारण ४० किलोमीटर. तिथे पोचून मूळ ठिकाणापर्यंत पोचायला पुन्हा एकदा थोडे खाली उतरायला लागते. नंतर दिसतो तो एखाद्या स्विमिंग पूल सारखा निळा डोह आणि जंगलातील वाटमार्गे पडत असलेला धबधबा. लाजवाब.
क्रेंगशूरी फॉल्स.
आज खऱ्या अर्थानी निसर्गाची वेग वेगळी रूपे पाहायला मिळाली. याबरोबरच नमूद करावेसे वाटेल माणसाची इचछाशक्ती असेल तर मावलीलॉंगसारख्या छोट्या गावालाही सुरेख करता येऊ शकते आणि आपल्यासारख्या शिकूनही अशिक्षितांसारखे वागणाऱ्या शहरी मनोवृत्तींना विचार करायला भाग पाडते. ४ वाजता संध्याकाळ झाली आणि आम्ही शिलॉंगकडे प्रस्थ झालो. रात्र शिलॉंगमध्येच हॉटेल ब्ल्यूबेरी इन् मध्ये काढली. भरपेट जेवण करून रात्री ९ वाजता झोपून गेलो.
दिवस ४ – लेटलूम कॅनॉन, शिलॉंग पीक, उमिअम लेक आणि तिथून पुढे गुवाहाटी. पहिले लेटलूम कॅनॉनला गेलो, पर्वतरांगा आणि मोठे पठार असे कॉम्बिनेशन असलेली हि जागा. भारत हा किती विविधतेनी नटलेला देश आहे याचं प्रत्यक्ष दृश्य आमच्यासमोर होते. साधारण २ तास तिथे काढून आम्ही पुढे निघालो. शिलॉंग पीक ला टुरिस्ट जॅम असल्यामुळे कॅन्सल केले आणि उमिअम लेक हा पिकनिक स्पॉट सारखा गजबजल्यामुळे तेही टाळले. मेघालयाच्या सुखद आठवणी मनात ठेऊन आमचा गुवाहाटीचा प्रवास सुरु केला. वाटेमध्ये जेवण केले.
दिवस ५ – काझीरंगा अभयारण्य – आमची पूर्ण सहल तीन टप्प्यामध्यें आखली होती. आता सहलीचा दुसरा आणि छोटा टप्पा म्हणजे गुवाहाटी ते काझीरंगा सुरु केला. सकाळी न्याहारी करून ७.३० वाजता आम्ही गुवाहाटी सोडले. साधारण २२० किलोमीटर्सचा हा टप्पा ४ तासात पूर्ण होतो. रोड कंडिशन्स खूप चांगली आहे. एका छोट्या हॉटेलमध्ये थोडेफार खाऊन घेतले आणि १.३० वाजता आमची जीप सफारी सुरु झाली. काझीरंगा नॅशनल पार्क हे प्रामुख्याने रायनासॉरकरता (गेंडे) प्रसिद्ध आहे. या शिवाय येथे हत्ती, रानडुक्कर, साप, विविध पक्षांच्या प्रजाती (गरुड, वूडपेकर, इंडियन रोलर), हरणाच्या विविध जाती या तुम्हाला सहज दिसतात. वाघ मात्र नेहमीप्रमाणे आपल्याला काही दिसत नाहीत. काझीरंगा अरण्य हे मुख्यतः ग्रास फॉरेस्ट म्हणून गणले जाते आणि १४० स्क्वेर मीटरवर पसरले आहे. दर पावसाळ्यामध्ये ब्रह्मपुत्रेचे पाणी या अरण्यात शिरते. आम्हाला असे सांगितले गेले, त्यावेळेस सर्व प्राणी मधल्या रस्त्यावर एकत्र जमा होतात. एकंदरीत या अरंण्यांची सहल सुंदर झाली आणि आणखी एक अनोखे अरण्य बघावयास मिळाले. जर वेळ मिळाला तर रात्री या जंगलाच्या जवळ राहायची सोय बघावी म्हणजे सकाळी हत्तीवरून सफारी करता येते. आम्ही मात्र वेळेच्या अभावी इथून पुढे ५० किलोमीटरवर तेझपूरला आमचा मुक्काम केला.
दिवस ६ – दिरांग – आमच्या प्रवासाचा तिसरा आणि अखेरचा टप्पा आज सुरु झाला. अरुणाचल प्रदेश. साधारण २०० किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण करायला आम्हाला ९ तास लागले. प्रामुख्याने भालुकपॉंग या गावानंतर ३०-३५ किलोमीटर घाटाचे दुरुस्तीचे काम चालले आहे त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत हा रस्ता कामानिमित्त बंद असतो. पहाटे ४ ला निघाल्यामुळे, आम्ही ९ च्या आत हा टप्पा पूर्ण करू शकलो. तुम्ही जसे तेजपूर सोडता आणि भालुकपॉंगमध्ये (अरुणाचलमध्ये) प्रवेश करता निसर्ग बदलायला सुरु होतो, कामेंग नदी सतत तुमचा पाठलाग करायला सुरु करते, हिमालयीन पर्वतरांगा तुम्हाला साद घालायला लागतात, स्वचछ सूर्यप्रकाश तुम्हाला स्पर्श करू लागतो आणि भारतीय सैन्य दल आणि त्यांच्या विविध तुकड्या तुमच्या अंगावर शहारे आणतात. घाट पार केल्यावर नदीकिनारी आम्ही थोडा विसावा घेतला. मुलांनी कुर्त्र्याच्या गोड पिल्लांशी खेळण्यात आपला वेळ घालवला. पुढे आम्ही बोमडिला मोनेस्टरी बघून निसर्गाकडे बघत दिरांगकडे प्रस्थान केले. रात्र दिरांग मध्ये घालवली. सुसाट्याचे वारे आणि बाजूला नदी असे दिरांगमधील हॉटेल होते. सर्विस मात्र सोसो होती.
दिवस ७ – तवांग व्हाया सेला-पास – आज बर्फ असलेल्या हिमालयीन पर्वतरांगात आम्हाला जायचे होते. सकाळी लवकरच दिरांग सोडले, वातावरण थोडे ढगाळ होते. बर्फ पडायची शक्यता असल्याने लवकर सेला-पास पार करणे गरजेचे होते. वाटेत एका टपरीवजा- दुकानातून किवी खायला घेतले. वळणावळणाच्या घाटातून आपण खूप उंच चाललो आहोत याची जाणीव होत होत होती. एका बाजूला खोल दरी आणि वर शिखर असा रस्ता होता. जवळपास अर्धा घाट पूर्ण केल्यावर अचानक वातावरण बदलले आणि एका आर्मी कॅन्टीनच्या परफेक्ट स्पॉटला बर्फवृष्टी सुरु झाली. सर्वजण खूपच उत्साहित झालो . पहिल्यांदाच आम्ही सगळ्यांनी बर्फवृष्टी बघितली होती. गाडीतून खाली उतरून आम्ही सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला. कॉफी घेऊन पुढे प्रवास सुरु केला. आता सर्वत्र बर्फ दिसायला सुरुवात झाली होती आणि बर्फवृष्टीहि सुरु होती. आम्ही आता सेला-पासला पोचलो. सेला पास हा हिमालयातील टॉप मोटोरेबल पीक मध्ये एक गणला जातो. १३७०० फिट अल्टीट्युडवर आहे हा. इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे आम्हाला सर्व ऍक्टिव्हिटी शांतपणे करा असे ड्राइवरने सांगितले. मुलांनी मात्र मनमुराद बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. आम्हीही भरपूर फोटो काढले. सेला लेक पूर्णपणे गोठला होता. ढगाळ वातावरणामुळे थंडी वाजत होती. साधारण अर्धा तास काढून आम्ही तवांगचा रस्ता धरला. आता जोरात बर्फवृष्टी सुरु झाली होती. नदी नाल्यापासून ते छोट्या धबधब्यापर्यन्त सर्व काही गोठले होते. सुरुच्या वृक्षांवर बर्फ पसरला होता. अतिशय स्वप्नवत स्वर्गात असावे असे दृश्य होते ते. थंडीही एव्हाना बोचरी झाली होती. अशातच एका खडतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर बर्फ आल्यामुळे सैन्याचे १०-१२ ट्रक एका मागे एक थांबले होते आणि घसरू नये म्हणून चाकांना साखळ्या लावत होते. मागील रांगेतील सर्व गाड्यांनीही चाकांना मोठे दोरखंड लावले. साधारण दिड तास गेला कोंडीत. पुढे एका पिकवर जसवंतसिंघ रावत स्मृती स्थळ लागले. ६२ च्या चीन युद्धात जसवंतसिंघांना वीरमरण आले. ३ दिवस एकटे ३०० चिनी बटालियन ते लढले आणि त्यांना रोखून ठेवले. सगळी कथा या ठिकाणी लिहिली आहे आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. हे सर्व पाहून आणि हा पराक्रम ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले आणि आम्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या पराक्रमामध्ये जसवंतसिंघांना सेला आणि नुरा या दोन स्थानिक महिलालांनी मदत केली. सेलाला वीरमरण आले तर नुराला पकडले गेले. सेला पास, नूरानांग नदी आणि नूरानांग फॉल्स हि नावे हे या दोन रणरागिणींच्या आठवणीत ठेवली आहेत. मराठा बटालियनच्या कॅन्टीन मध्ये चहा आणि डोसा खाऊन गारठलेल्या अवस्थेत आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. हळू हळू दिवस मावळायला लागला, बोचरी थंडी होती आणि आम्ही तवांगचा प्रवास सुरु केला. सर्वजण खूप दमलो होतो. एव्हाना पुन्हा जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली होती. साधारण ७ वाजता आम्ही तवांगला, कायगी कांग झेन्ग या हॉटेल मध्ये पोचलो. कडाक्याच्या थंडीत थोडे फार जेऊन घेतले आणि झोपलो.
सेला-पास
दिवस ८ – तवांग – तवांग हे अरुणाचलमधील छोटेसे शहर १०,००० फीट अल्टीट्युडवर वसले आहे. सकाळी उठून हॉटेलच्या खिडकीतून बाहेर बघितले तर सर्व शहर बर्फ़ानी आचछादलेले होते आणि आजू बाजूला बर्फाच्या पर्वतरांगा. अद्भुत. मूळ प्लॅन प्रमाणे आज आम्ही बुम्ला पास आणि माधुरी लेक करणार होतो. पण आदल्यादिवशी झालेल्या झालेल्या अति बर्फवृष्टीमुळे सैन्याने पुढे जायला परवानगी दिली नाही. तेथील तापमान उणे १५ अंश आणि वारा १५ केएमपीएच होता. यामुळे आम्ही आज तवांगमध्येच दिवस काढायचा ठरवलं. उणे तापमानामुळे नळातील पाणीही गोठले होते, साचवलेले टाकीतील पाणीही गोठले होते. हॉटेल स्टाफनि बर्फ फोडून पाणी तापवून दिले. येथे पाण्याची थोडी गैरसोय झाली, पण एक्सट्रीम क्लायमेटमुळे त्याला पर्याय नव्हता. अजून एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अरुणाचलमध्ये स्त्रिया आपल्या तान्ह्या बाळांना एका विशिष्ट प्रकारे पाठीला बांधून सतत काम करताना दिसतात. फोटो काढायचा राहिला त्याचा. तवांगमध्ये सगळीकडे बुद्धिस्ट कल्चर आहे. आम्ही आज इथली मोनेस्टरी, बुद्धा स्टॅचू, १९६२ वॉर मेमोरियल, लेझर शो आणि शॉपिंग केले. आज सर्वत्र स्वचछ सूर्यप्रकाश होता पण सुसाटयाचे वारा असल्यामुळे दिवसभर खूप बोचरी थंडी होती . तवांग मोनेस्टरी हि भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी मोठी मोनेस्टरी आहे. तवांग मोनेस्टरी हि पर्वताच्या रांगेवर एका बाजूला अधांतरी आहे आणि गौतम बुद्धांनी तिला धरून ठेवले आहे अशी आख्यायिका येथील स्थानिक सांगतात. यामध्ये बुद्धाची खूप मोठी मूर्ती आहे, इसवीसन पूर्वकालीन वस्तूंचे संग्रहालय आणि बुद्धिस्ट मॉंकची शिक्षणाची सोय आहे. आत मोनेस्टरीमध्ये काही वेळ ध्यान धरले, अतिशय सुंदर आणि शांत जागा होती ती.
१९६२ वॉर मेमोरियल तुम्हाला युद्धाच्या परिस्थिती, मॅकमोहन लाईन या इतिहासातील आठवणी ताज्या करते. याबरोबरच वीरमरण आलेल्या २००० पेक्षा अधिक सैनिकांसमोर नमन करायला भाग पाडते. सैन्याने इथे युद्धाची माहिती द्यायला ओपनथिएटर मध्ये दररोज लेजर शो ठेवला आहे. तो शो बघून कडाक्याच्या थंडीत आम्ही हॉटेलमध्ये परतलो आणि साधारण ७ वाजता झोपून गेलो.
दिवस ९ – तवांग ते बोमडिला व्हाया सेला पास – आज आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. साधारण २०० किलोमीटरचा अंतर सेला-पास मधून पार करायचे होते, म्हणून आम्ही लवकर निघालो. आकाश निरभ्र होते. जाताना वाटेत एका छोट्या हॉटेलमध्ये मॅगी आणि मोमोस खाल्ले. वाटेत पुढे जन्ग फॉल्स लागतो, जावे कि नाही या विचारात तिथे पोचलो. पण जेव्हा पोचलो तेव्हा होता तो अद्भुत नजारा. धबधब्याचे पाणी कोसळत होते आणि खाली येऊन गोठत होते, बाजूला नदी आणि हिमालयीन पर्वतरांगा. कुठल्याही कॅमेरात हा नजारा कैद करणे अवघड होते. तिथे साधारण अर्धा तास घालवून पुढे निघालो.आकाश निरभ्र असल्यामुळे जाताना चुकलेला निसर्ग बघत होतो. परत एकदा सेला पास मध्ये थांबलो. खाली उतरून सेला लेक पाशी फोटो काढले या वेळेला. मुलंही खेळली परत इथे. सेला लेक पासून पुढे निघाल्यावर मोठा घाट, सर्वत्र बर्फ आणि बर्फातून काढलेले वळ्णावळणाचे घाटातील रस्ते. परमेश्वराने निसर्गाची उधळण केली होती. गाडीमध्ये गप्पा गोष्टी, गाणी म्हणत साधारण ६ वाजता बोमडिलाला पोचलो. रात्र बोमडिलामध्ये काढली.
दिवस १० – बोमडिला ते गुवाहाटी – साधारण ३०० किलोमीटरचं हे अंतर पार करायला १० तास लागतात. ब्रेड जॅम पाक करून सकाळी ७.३० वाजता आम्ही निघालो. निघाल्यावर जवळच घाटात एका ठिकाणी खाली उतरून नदीपाशी गेलो, थोडा विसावा घेतला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला. सेला-पास नंतर पुढे बराच वेस्ट कामेंग जिल्हा आहे. मोठा घाट आणि वळ्णावळणाचे रस्ते उतरून आम्ही खाली उतरलो. आणि आम्हाला अरुणाचल-आसाम-भूतान हि ट्रँग्युलर बॉर्डर लागली. त्यानिमित्ताने भूतानमध्ये गाडीत डिझेल भरले आणि आणखी एक देश झाल्याचे समाधान मिळाले. एका ठिकाणी मुलांनी हत्तीवर बसण्याचा आनंद घेतला. पुढचा प्रवास पूर्ण करून ३१ डिसेंबर च्या रात्री गुवाहाटीमध्ये पोचलो आणि नवीन वर्षाचे स्वागत हॉटेलच्या रूममध्ये कॉफी पिऊन केले.
भूतान
दिवस ११ – परतीचा प्रवास – आज सकाळी थोडं निवांत उठून ब्रम्हपुत्रेचे पात्र बघायला गेलो. फार काही मिळाले नाही. थोडे शॉपिंग करून गुवाहाटी एरपोर्टला गेलो. तिथून गुवाहाटी-बंगलोर-पुणे हा विमान प्रवास करून रात्री १ ला घरी आलो. या सगळ्या प्रवासात बिपुल हा आमचा ड्राइवर अतिशय स्किलड आणि प्रोफेशनल होता. एकंदरीत हा ११ दिवसाचा प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील. अजून एक नमूद करावेसे वाटते भारताचा पूर्व भाग विकासापासून वंचित राहिला. तवांग सारख्या ठिकाणी कॉलेज १ वर्षांपूर्वी सुरु झाले. आपण या सर्व बांधवांचे आणि भारतीय सैन्याचे आभार मानायला हवे कि काश्मीर सारखा फुटीरता वाद येथे मोठ्या प्रमाणात फोफावला नाही. अरुणाचल मधले बहुतांश लोक भारतीय सैन्याची सेवा करतात आणि जरुरत पडेल तेव्हा सेला सारख्या स्त्रिया आपली आहुतीही देतात. हळू हळू हा भाग आता पुढे जायला लागला आहे, अजून खूप मोठा पल्ला आहे.
इतके लिहून, इथेच हे स्वप्नवत प्रवास वर्णन संपवून काही दिवस आठवणींमध्ये रमायला आम्हा सर्वांना आवडेल. धन्यवाद.